Friday, 29 November 2013

पडद्यामागील ‘भाई’!

एफएमने रेडिओचा पुनर्जन्म झाला. तरुण पिढी परत त्याच्याकडे वळली. नाहीतर टेलिव्हिजनने त्याला अगदी तडीपार करण्याची वेळ आणली होती. एफएम येण्यापूर्वीच्या आणि टेलिव्हिजन जिकडेतिकडे झाल्यानंतरच्या काळात तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास सोसत तो कुठे कुठे छोट्या गावांत, पानाच्या दुकानांत, चांभाराच्या हत्यारांबरोबर, लोकवस्ती कमी असलेल्या आणि वीज नसलेल्या गावांत बॅटरी सेल्सच्या आधारावर, लहानग्या ट्रांझिस्टर सेटच्या आधारावर तग धरून राहिला होता. कॉम्प्युटर आल्यावर धुगधुगी उरलेल्या टाइपरायटरसारखा.
 
 
माझ्या लहानपणी, म्हणजे 1950च्या काळात, रेडिओची स्थिती अगदी वेगळी होती. तो प्रसारमाध्यमांचा राजा होता. त्याचा रुबाब मोठा होता, आकार मोठा होता. त्याचे कॅबिनेट उत्तम प्रतीच्या लाकडाचे असायचे. मध्यमवर्गातल्या अनेक दिवाणखान्यात त्याच्याकरता एक खास ‘रेडिओ केस’ करून घेतलेली असायची. तो ट्रांझिस्टरसारखा कुठेतरी ठेवता येत नसे. तो एरियलने जोडलेला असे आणि त्याला ध्रुवासारखे अढळ स्थान असे.

महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता कधी कधी संपूर्ण कुटुंब त्याच्याभोवती जमत असे. टेलिव्हिजनमधला आणि रेडिओतला मोठा फरक म्हणजे रेडिओ तुम्हाला इतर कामे करताना ऐकता येतो. आईला तो जरा मोठ्याने लावला की स्वयंपाकघरातून आणि आजी-आजोबांना आपली बैठक न सोडता ऐकू येऊ शकत असे. माझ्या एका मैत्रिणीच्या आजीला तो इतका आवडायचा, की ती त्याला प्रेमाने रेडोबा म्हणायची. घरात काम करणा-या नोकरमंडळींना ग्रामीण कार्यक्रम किंवा कामगार सभा ऐकता यायची. घरात एकटे राहणारे लोक एकटेपणा भासू नये म्हणून रेडिओ लावून ठेवत असत. मग तो ऐकलाच पाहिजे अशी सक्ती नसे.

रेडिओच्या कार्यक्रमात भाग घेणा-यांना ‘रेडिओ स्टार’ म्हणत असत. त्यांना सिनेस्टारइतका पंचतारांकित मान नसला, तरी तीन ते चार तारे त्यांच्या वाट्याला यायचे. कुणाच्या घरी रेडिओ-स्टार आल्यास शेजारची मंडळी कोणते ना कोणते निमित्त काढून जरा डोकावून तरी जायची.

मुलांकरता रेडिओत मराठीत खास कार्यक्रम असायचा तो ‘गंमत जंमत’ आणि त्याचे सहनिर्माते होते मायाताई - माया चिटणीस आणि नानोजी - नारायण देसाई.

‘गंमत जंमत’च्या एका कार्यक्रमात मला काम मिळाले. आमची तालीम चालू असताना एक जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कुरळ्या केसांचे, अंगाने स्थूल आणि वर्णाने सावळे असे गृहस्थ आले आणि तालीम ऐकू लागले. खरे म्हणजे रेडिओच्या शिस्तीप्रमाणे स्टुडिओत कोणत्याही परक्या गृहस्थाला प्रवेश देत नसत आणि थारा तर बिलकुल देत नसत. तरी एवढे धार्ष्ट्य करणारा हा गृहस्थ कोण, असे आम्हा सगळ्या मुलांनाच वाटले. आता त्याला मायाताई रागावतील आणि बाहेर काढतील असेही वाटत होते. पण त्यादेखील या गृहस्थांशी आदराने बोलून परत तालमीला लागल्या. पाच-एक मिनिटे तालीम झाल्यावर या गृहस्थांनी मायातार्इंना बोलावून त्यांच्याशी हलक्या आवाजात काही हितगुज केले. मग त्या आमच्यात परत आल्या आणि मला म्हणाल्या, ‘अरुण, तालमीनंतर तू जरा थांब.’

तालमीनंतर मायाताई मला त्या गृहस्थांकडे घेऊन गेल्या आणि त्यांची ओळख करून दिली. त्यांचे नाव पु. ल. देशपांडे. ते त्या वेळी आकाशवाणीवर निर्माते होते. मी त्यांचे नाव लेखक म्हणून ऐकले होते आणि पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘नस्ती उठाठेव’ या पुस्तकातला धडा तर मला बेहद्द आवडला होता. त्यांना त्यांच्या रेडिओ-नाटकात भूमिका करायला एक मुलगा हवा होता. तालमीतला माझा आवाज आणि बोलण्याची पद्धत त्यांना आवडली. तिथून ‘भाईं’च्या बरोबर काम करायला सुरुवात केली. कारण ते लवकरच ‘भाई’ झाले. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांची पुस्तके वाचायला लागलो. ती मला आवडलीच, पण शिवाय अनेकांप्रमाणे मी भाईंच्या प्रेमात पडलो. त्यांची विनोदबुद्धी, त्यांचा प्रेमळ आणि लाघवी स्वभाव, हलक्या हाताने दिग्दर्शन करण्याची पद्धत हे सारे पटकन आपलेसे करणारे होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सात-आठ नाटिकांत काम केल्यानंतर त्यांनी मला श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हत्या’ कादंबरीचे आपण आठ भागांत नभोनाट्य करणार आहोत, त्यात हत्याची भूमिका करतोस का म्हणून विचारले. मला आणि माझ्या घरच्यांना फार आनंद झाला.

‘हत्या’ ही पेंडसे यांची एक मनाला चटका लावणारी कादंबरी आहे. शिवाय तिच्यातले मुख्य पात्र कोकणातल्या पडझड झालेल्या कुटुंबातील एक लहान मुलगा आहे. त्याचेच नाव हत्या किंवा संपूर्ण नाव हणमंत आणि त्याचे छोटे रूप हत्या. कादंबरी एकूण ज्याला (जर्मन भाषेत) बिल्डुंग्सरोमान म्हणतात तशी. जीवनशिक्षणाची कथा.

भाईंच्या दिग्दर्शन शैलीबद्दल थोडे काही सांगतो. अर्थात हे सारे त्या वेळी स्पष्ट जाणवले नव्हते. पण हळूहळू अंगात भिनत होते. भाई एक अत्यंत उत्तम नकलाकार होते हे त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’च्या श्रोत्यांना सांगायला नको. मी मुद्दामच श्रोत्यांना म्हणतोय. कारण भाईंच्या दिग्दर्शनाचे आणि लेखनशैलीचे अनुभव ग्रहण करणारे सर्वात समर्थ ज्ञानेंद्रिय म्हणजे त्यांचा कान. त्याला संगीताचे सारे सूक्ष्म हेलकावे आणि भाषेचे सारे हेल समजत असत. त्यांच्या दिग्दर्शनात एखादे पात्र निर्माण करताना त्याचे बोलणे त्यांना ऐकू येते आहे अशा बारकाईने ते तुम्हाला सूचना देत. मात्र या सूचना वाक्यावाक्याला दिल्या जात नसत. ते तुम्हाला त्या पात्राच्या नाडीवर बोट ठेवायला लावून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकवत. ते एकदा लक्षपूर्वक ऐकलेत, की मग पुढचे तुमच्यावर. हे पात्र त्यांनी पाहिलेले असण्यापेक्षा त्यांनी कल्पनेत ‘ऐकलेले’ असायचे. एकदा त्यांना ते नीट ऐकू आले, की ते नखशिखान्त तयार झाले. हत्यातली विविध पात्रे पेंडश्यांच्या लेखणीतून बाहेर पडून पुराणातल्या कथांसारखी भाईंच्या कानातून पुन्हा जन्मून रेडिओलहरींवर तरंगू लागली. या नभोनाट्याला अमाप लोकप्रियता मिळाली. महाराष्टÑाच्या, विशेषत: कोकणातल्या कानाकोप-यातल्या छोट्या छोट्या खेड्यांतूनदेखील पत्रे यायची. आठवड्याला सुमारे पाचशेच्या वर पत्रे येत असत. भाईंच्या या नवीन प्रकारच्या निर्मितीने त्यांच्या सर्व लेखनाप्रमाणे महाराष्टाला वेडच लागले आणि मी अचानक ‘रेडिओस्टार’ झालो. त्याबद्दल विविध वृत्तपत्रांतून फोटोही येत असत. प्रसिद्धीचा माझा हा पहिला अनुभव आणि तो काही वाईट नव्हता. वय वर्षे आठ. जवळजवळ एक वर्षभर महाराष्टात मी ‘हत्या’ म्हणूनच प्रसिद्ध होतो. मलाही या हत्याबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. त्याली मी आतून ओळखू लागलो. सुमारे दोन-एक महिने एकत्र काम केल्याने बाकीच्या संचातले सारे एकमेकांना कादंबरीतल्या नावाने हाका मारत. विनायक महाजन हा भुत्या, ताराबाई तळवलकर या माझ्या आई, इत्यादी.

साधारण चौदाव्या वर्षापर्यंत माझा रेडिओशी आणि मराठी रंगभूमीशी संबंध होता. वयोमानाप्रमाणे माझे आकर्षण कमी झाले. अधूनमधून एखादे नाटक पाहावे किंवा वाचावे इतपत. कधीतरी त्या काळातले कोणीतरी भेटले किंवा काही संदर्भ आला तरच या आठवणींना उजळा मिळायचा. पण मला माझे असे काही या काळात नक्कीच सापडले.

बरीच वर्षे लोटली.

1988च्या सुमारास शांता गोखले यांनी केलेले पेंडश्यांच्या ‘जुम्मन’ या दीर्घकथेचे भाषांतर मला पेंडशांना नेऊन द्यायचे होते. मी पेंडश्यांचे घर शोधत त्यांच्याकडे पोचलो. त्यांनी माझे आगतस्वागत केले. मी शांताबार्इंचे आणि माझे नाते त्यांना सांगितले. ते शांताबार्इंच्या वडलांना म्हणजे श्री. गोपाळ गुंडो गोखले यांना ओळखत होते. त्यांच्याविषयी गप्पा झाल्या. पेंडसे बोलताबोलता एकदम थांबले, माझ्याकडे वळले आणि त्यांनी मला विचारले, ‘‘अहो, अरुण खोपकर नावाचा एक मुलगा होता. त्याने माझ्या हत्या कादंबरीचे भाईने नभोनाट्य केले होते त्यात हत्याची भूमिका केली होती. तो तुमचा कोण?’’ मी त्यांना तो मुलगा मीच असे सांगितल्यावर त्यांनी एकदम माझा हात घट्ट धरला आणि म्हणाले, ‘‘काय योगायोग आहे पाहा! मी त्या हत्याला तीस-एक वर्षे शोधतोय. आणि आज तो असा मिळाला. वाह वा! किती सुंदर काम केले होतेत तुम्ही. अगदी माझ्या मनातला हत्या उभा केला होतात.’’ दोन तीन दिवसांनी शिवाजी पार्कला सकाळी फिरताना मला दोघातिघांनी सांगितले, की आदल्या दिवशी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेंडश्यांचा सत्कार झाला होता. त्यात त्यांनी हत्या त्यांना तीस वर्षांनंतर कसा परत भेटला याची कथा माझ्या नावासकट सांगितली होती. कादंबरीतले पात्र परत भेटल्याची कथा. माझा एक जुना शाळकरी मित्र या कार्यक्रमाला गेला होता. त्याने मला पाहताच लांबूनच हाक मारली, ‘‘काय हत्या!’’ तीस वर्षांनी हत्याचा पुनर्जन्म झाला. दोन दिवसांकरता का होईना.

--
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

हे जग मी सुंदर करुन जाईन...

मित्रांनो, 'तो' मीच का 'तो मी नव्हेच' अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो 'मी'च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अत्यंत निकटचे स्नेही असल्यामुळे अशी अतिशयोक्ती होणे स्वाभाविक आहे. मला भीति वाटू लागली होती की, आता हे मी त्यांना अगदी खाजगीत सांगितलेल्या गोष्टी अशा उघड्यावर बोलतात की काय? आणि त्यांनी तसे केले असते तर मी त्यांच्याच एखाद्या सुंदर नाटकाचा विषय घेऊन त्यावर बोलण्याचे ठरविले होते. वास्तविक "कानेटकरांचे सुंदर नाटक" असे म्हणण्यात द्विरूक्ती झाली आहे; कारण कानेटकरांचे प्रत्येकच नाटक सुंदर असते. परंतु कानेटकरांनी तेवढा संयम राखला आणि मला ती संधी दिली नाही.

आताच प्राचार्यांकडून मला असे सुचविण्यात आले की, मी काही मार्गदर्शनपर गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना उपदेश करावा. वास्तविक माझा असा उपदेश करण्यावर आणि तो उपदेश लोक ऐकत असतील या दोन्हींवर विश्वास नाही.प्रथम ह्या प्रसंगी ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत आणि ज्यांनी त्यांना ती मिळू दिली अशा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांचा बचाव करण्यात श्री. तिजारे व श्री. शिंदे यांनी दाखविलेल्या सहजस्फ़ूर्त धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तुमच्या ह्या नाशिक शहराला एक विशेष परंपरा आहे. ती म्हणजे कधी तरी राम येथे पंचवटीत येऊन राहिला आणि सीतामाईने त्याचे पाय चुरले म्हणून नव्हे किंवा नाशिकच्या चिवड्यासाठीही नव्हे. परवाच मी कोणाला तरी सांगितले की मी नाशिकला जात आहे. त्यांनी "ऑं!" असा उद्गार काढला व अगदी चेहरा पाडला. मी म्हटले तसे काही नाही-- स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी जात आहे.
नाशिक शहराला सावरकर, कान्हेरे यांच्यासारख्या क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे आणि आजही जशी ह्या आठवणींची ज्योत माझ्या ह्रदयात तेवत आहे तशीच ही आठवण तुमच्याही ह्रदयात सतत तेवत राहील अशी माझी खात्री आहे. असले प्रसंग किरकोळ म्हणून नाउमेद व्हायचे कारण नसते. कल्पना करा की,सूर्य मावळताना त्याला चिंता पडली की,माझा उजेड संपल्यावर या सर्व जगाचे कसे होणार?--- सर्व सत्ताधारी व्यक्तींची हीच भीती असते की, माझ्यानंतर या खुर्चीचे काय होणार? सूर्य तरी याला अपवाद कसा? सर्व विद्युद्दीप पेटले होते, मशाली पेटल्या होत्या, अशा वेळी एक बारीकशी पणती---केवढी मिणमिणती ज्योत होती त्या पणतीची !---ती म्हणाली,"भगवन , मला होईल तेवढे मी आपले कार्य करीन. कदाचित आपल्याइतके सामर्थ्य नसेल माझ्या या प्रकाशात. परंतु म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही." स्वा. सावरकर, कान्हेरे यांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांच्या साहसाइतके तुमच्या तिजारे, शिंदेंचे साहस मोठे नसेल, पण त्यालाही महत्व आहेच. त्यांच्या कर्तव्यतत्पर साहसप्रवृत्तीला महत्त्व आहे.

मी असे ठरविले होते की, काही भाषण तयार करुन जाण्यापेक्षा येथे आल्यावरच तुमच्याशी काही हितगुज करावे. असे भाषण तयार करुन जाण्याचे माझ्यावर अनेकदा प्रसंग येतात आणि येथे तर ते नेहमीच येत असतील. आजचा विद्यार्थीवर्ग बदलला आहे, असा गहजब नेहमी कानांवर पडतो, पण मला तरी हा विद्यार्थीवर्ग बदलला आहे असे वाटत नाही. विद्यार्थ्यांचे बाह्यांग बदलले आहे, पॅंट्सची रूंदी कमी झाली आहे. तरुणींच्या पोषाखाबाबत मी जास्त तपशीलात शिरत नाही. गॅदरींगच्यावेळी एखादा विद्यार्थी बक्षीस घेत असताना 'वशिला' करुन ओरडणे...सर्व तेच आहे. मीही तुमच्यासारखा असताना असेच ओरडत होतो, आणि म्हणून मला वाटते, जे लोक असे म्हणतात की, विद्यार्थी बदलले आहेत ते लोक स्वतःची विद्यार्थीदशा पूर्णतया विसरलेले असतात.
मला काही सांगायचंय ह्या कानेटकरांच्या नाटकाच्या नावाचा आधार घेउन मी असे सांगतो की, प्रत्येकाच्या कृतीत 'मला काही सांगायचंय' ही भावना असते. आणि ऐकू इच्छिणाऱ्या समोरील व्यक्तिमध्येही त्याचा अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बस पकडण्यासाठी काय माणसे धावत नाहीत ? परंतु त्या धावण्यामागे आणि आताच्या या 'रनिंग'च्या स्पर्धकांच्या धावण्यामागे काही निराळा दृष्टीकोण असतो. त्यामधून त्याला काही सांगायचे असते. त्याचप्रमाणे रांगोळीस्पर्धा. त्या स्पर्धकांना माहीत असते की, रांगोळी फार तर उद्यापर्यंत राहील आणि परवा हा दिवाणखाना झाडणारा नोकर ती रंगोळी, ती कलाकृती झाडून टाकणार आहे. आणि हे माहीत असूनही ते कलावंत पाच पाच, सहा सहा तास खपून ती रांगोळी काढीतच असतात.कारण त्या कलाकृतीतून त्यांना काहीतरी सांगायचे असते. परंतु ते सांगणेसुद्धा सुंदर व आकर्षक असावे लागते. उदारणार्थ, एखाद्या मुलीचे लग्न ठरले---मुलीचे येथे नाव मुद्दामच घेत नाही, नाहीतर उद्यापासून तिचा कॉलेजमध्ये छळ सुरु व्हायचा. म्हणूनच मी 'क्ष' असे म्हणतो. आणि क्ष वगैरे म्हटल्याने आपण विद्वान असल्याचा आनंद होतो---तर समजा, त्या मुलीचे लग्न ठरले, तर लागलीच तिची आई पहिल्या शेजारणीला सांगते,"अहो ऐकलं का ?" ती एकदम सांगत नाही, आमच्या मुलीचे लग्न ठरले म्हणून ! "अहो ऐकलं का ?" की त्यावर ती शेजारीण म्हणते,"का हो,काय झालं ?" ती आई मग सांगते ," बरं का ! आमच्या 'क्ष'चं लग्न ठरलं ! आणि अगदी अचानक , अकल्पितच ठरत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी चूक अत्यंत आनंदात साजरी होत असते आणि ह्या सर्व गोष्टी सारे जण रस घेऊन ऐकत असतात.

साहित्य-संगीत-कला या सर्वांच्या मुळाशी 'मला काही सांगायचयं' हीच भावना आहे. उक्तीने व कृतीने आपले म्हणणे सांगण्याची ऊर्मी तुम्हा-आम्हा सर्वांत आहे. सूर्योदय आपण कधी नव्हे तो चुकून एखाद्या वेळी पाहिला असला तरी सूर्योदयाचे चित्र आपण आनंदाने पाहतोच. म्हणजेच या सांगण्यामध्ये आनंद असावा. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याला "का रे झाला का बक्षीसमारंभ ? किती बक्षीसे वाटली ?" असे विचारल्यावर त्याने " वाटले पन्नाससाठ कप " असे उत्तर दिल्यास विचारणाऱ्याला पुढे हिंमतच व्हायची नाही. पण तेच जर "वा ! केवढी गर्दी झाली होती पु. लं. च्या भाषणाला ! काय त्यांची लोकप्रियता !" (मी पु. ल. नाव फ़क्त उदाहरणादाखल घेतले आहे व 'क्ष' जागी ते घेतले आहे.) असे सांगितल्यावर विचारणाही साहजिकच "ही आली होती का, ती आली होती का," असे विचारील आणि सांगणाराही अत्यंत आनंदाने सांगेल---कॉलेजमध्ये कधी न दिसणाऱ्या मुली आज दिसत होत्या...आणि त्या बोलण्याच्या आनंदात मग पु. ल. आपोआप केव्हाच मागे पडतील.

जीवनातील आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पहावे, अशी जी आपली इच्छा असते तीतच माणसाचे माणूसपण आहे. परंतु जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाला "मला तुझं काही ऐकायचं नाही, तुला काही सांगायचं नाही" असे म्हणतो आणि हे सांगणे व ऐकणे जेथे संपते तेथेच त्या माणसातला माणूसही स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो.परंतु माणसामाणसांचे हे प्रेम व सहानुभूती इतकी उत्कट असते की, माणसाला मरतानासुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही तर त्याला थरथरणाऱ्या मांडीचा आधार डोक्याखाली लागतो. पाकिस्तानमध्ये झालेल्या वादळाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या वा घरकुले विस्कळित झालेल्यांबद्दल आपणाला सहानुभूतीच वाटते. त्या वेळी आपण त्यांच्याकडे पाकिस्तानी म्हणून न बघता एक माणूस या दृष्टीनेच पाहतो.

दुर्दॆवाने 'सहानुभूती' हा शब्द आजकाल दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो. वास्तविक सहानुभूती म्हणजे सह + अनुभूती = दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभवविश्वात शिरणे, ही माणसाची महान शक्ती आहे. उदाहरणार्थ, कानेटकरंचे शिवाजीवरील नाटक ! आपणांला माहीत आसते की शिवाजीचे काम करणारा माणूस हा शिवाजी नाही, तर तो रंगमंचावर काम करणारा एक नट आहे आणि तो आपल्याशी बोलत आहे---खरा शिवाजी असता तर आपणांशी बोललाही नसता. कारण आपण नालायक बनलो आहोत---परंतु आपण हे नाटक पाहण्यासाठीसुद्धा पैसे खर्चून जातो आणि विकत काय घेतो तर शिवाजीची व्यथा ! आपल्याही नकळत आपला त्यातील पात्रांशी नाट्यगृहात एक मूक संवाद चाललेला असतो. असे एखादे यंत्र निघाले आणि त्यातून हा मूक संवाद टेप झाला तर तो आपणाला स्पष्टपणे ऐकू येईल. ह्यालाच सहानुभूती ---सह + अनुभूती---म्हणतात. ही शक्ती निसर्गाने फ़क्त मानवालाच दिली आहे आणि ही सहानुभूती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपणांस आपण माणूस असल्याचा आनंद होतो आणि त्यातील प्रेक्षक हा त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तारांपैकी निगेटीव्ह तार बनलेला असतो. त्यातूनच आनंददान नि आनंदग्रहण अखंडतया सुरु असते.

म्हणून साहित्य, संगीत, कला या सर्वांच्या मूळाशी मला काही सांगायचयं हीच भावना असते आणि माणसाची स्वाभाविक भावना दुसऱ्याच्या अनुभवविश्वात रममाण होण्याची असल्यामुळे आपण ही ते अनुभवितो आणि त्यातील कलेचा आस्वाद घेतो. गडकऱ्यांचे 'एकच प्याला' बघायला गेल्यावर आपण आपोआप म्हणतो," काय सुंदर श्ब्दांत यांनी सिंधूचं दुःख वर्णन केलं आहे !" त्या कलेच्या आस्वादापासून आपणांस एक प्रकारचा आत्मिक आनंद प्राप्त होतो आणि एक मूक संवाद पुन्हा आपल्या ह्र्दयात सुरु होतो. परंतु उद्या जर तुमच्या शेजारी एखादा दारुड्या आपल्या बायकोला मारीत असेल आणि ती रडत असताना तुम्ही तिथे जाऊन "वा ! काय सुंदर देखावा आहे !" असे म्हणालात तर पुढचा फटका कोणाला बसेल हे तुम्ही जाणताच !

निराशावादी माणसालासुद्धा "मला मरावंसं वाटतं" असे दुसऱ्या कोणाला तरी सांगावेसे वाटते आणि तो आपल्या कवितेद्वारा आपले ते विचार बोलून दाखवतो. आपण जर त्याला म्हटले," मग आपण गेलात तरी चालेल " तर तो म्हणतो," पुढची कविता तर ऐका ! " खरे म्हणजे आजच्या कॉंग्रेसच्या राज्यात जीव देण्यासारख्या अनेक जागा मला दाखवता येतील.

संगीताच्या मैफलीच्या वेळी मला अनेकदा विचारले जाते, गाणे किती वाजता सुरु होणार आणि किती वाजता संपणार ? मी त्या गृहस्थाला नमस्कार करतो आणि सांगतो, कृपा करुन आपण येऊ नका. गाणे रात्री सुरु होईल आणि पहाटेपर्यंत केव्हातरी संपेल. संगीतातील सूर, लय, ताल यांचे ज्ञान माणसास हळूहळू येते. लहानपणी मुलाला खेळवताना त्यांच्या साऱ्यांच्या आया गाणे म्हणतात---"अडगुलं मडगुलं." पण मला वाटते, शेकडा ४ टक्के मुले बरोबर त्या त्यालावर हातपाय हलवतात. बाकीची मुले इतकी मठ्ठ असतात की त्यांच्या आया स्वतः नाचल्या तरी ती गप्पच असतात. ही मुले बहुतेक पुढे कुठेतरी तत्वज्ञानाचे प्राध्यापक होत असतील.

आजचा विद्यार्थी असंतुष्ट आहे असे आज सर्वत्र म्हटले जाते. पण मी विचारतो विद्यार्थ्यांनी काय संतुष्ट असायला पेन्शन घेतले आहे, की त्यांनी म्हणावे बायकोमुले सुखात आहेत ? विद्यार्थ्यांनी असंतुष्टच असायला हवे. पण तो असंतोष विघातक नको. त्यातून मशाली पेटल्या पाहिजेत. नाहीतर आपण कचराच पेटवाल. हा असंतोष पूर्वापार चालत आल आहे. तुकाराम काय संतुष्ट तरुण होता ? ज्ञानेश्वर असंतुष्ट होते म्हणूनच 'अमृतातेही पैजा जिंके' अशा भाषेत गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणले. एकाच चिखलात कमळ आणि बेडूक दोन्ही असतात, पण बेडूक चिखलातच बुडालेला असतो आणि कमळ मात्र चिखलातूनही मान वर करुन उभे असते. आपण बेडूक होणार की कमळ होणार ते आपणच ठरवा.
आपण आज ह्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी मला बोलावले. वास्तविक आपण जे रोज येथे जमता तेव्हा का तुमच्यत स्नेह नसतो ? कधीकधी तर स्नेह जुळावासा वाटतो पण तो जुळत नाही. परंतु अशा स्नेहसंमेलनातून आपणांला काहीतरी सांगायचे असते. अशा वेळी वक्त्याचे भाषण पाडून ओरडा करणे हे विद्यार्थ्याचे साहस नाही. त्या वक्त्याचे त्यात काही जात नाही ! मुले मूर्ख आहेत असे म्हणून तो निघून जातो. परंतु वर्गातील १०० मुलांमध्ये ' मला हे समजलले नाही ' म्हणून उभे राहून प्राध्यापकाला ताडकन विचारणे हे साहस ! परंतु हे साहस कोणी करीत नाही. दोन हजारांतील फक्त पाचशे विद्यार्थीच खरे विद्या + अर्थी या नात्याने आलेले असतात. बाकीचे आई-वडिलांनी पाठविले म्हणून आलेले असतात. या बाबतीत पालकांचे अज्ञानही बघण्यासारखे असते. एखाद्या मुलाने जर म्हटले की " मी 'अर्ध' मागधी घेतो ; ते स्कोअरिंग आहे." तर पालक म्हणतात, "मग 'पूर्ण' मागधी का घेत नाहीस ? 'अर्ध'-मागधीच का घेतोस ?" आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये खरी ज्ञानलालसा कमी असते. पण पुढच्या वर्षी जर ती ज्ञानलालसा असलेली पाचशेच मुले ह्या कॉलेजमध्ये राहिली तर मी ह्या कॉलेजची भरभराट झाली असेच म्हणेन ! मग येथे एवढाल्या लायब्ररीज, लॅबोरेटरीज नसतील तरी ज्ञानलालसेच्या ईर्षेमुळे एखाद्या झाडाखाली फिजिक्सकेमिस्ट्री आणि मॅथ्ससारखे विषयही शिकता येतील.

मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या एका मुलीला विचारले,"तुम्हांला ज्ञानेश्वरांचं काय काय आहे ?" तर ती म्हणाली,"१० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे." मी पुढे विचारणार होतो की, "माझं किती साहित्य आहे ?" पण पहिल्या उत्तराने मला पुढील प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण ज्ञानेश्वरच दहा मार्कांचा तर मला १ लक्षांश तरी मार्क असेल की नाही कोणास ठाऊक ! आजकाल समग्र ज्ञान मिळविण्याची ईर्षा कमी झाली आहे. त्यांचा ज्ञान मिळविण्याचा 'स्पॅन' लिमिटेड झाला आहे. एका डिग्रीच्या बिनमहत्त्वाच्या कागदासाठी ही सर्व झटापट आहे. या बाबतीत एका पीएच.डी.च्या विद्यार्थिनीचा मला आलेला अनुभव आपणापुढे मांडतो. तिने पीएच.डी.साठी 'मराठी कादंबरी' हा विषय घेतला होता. मी तिला नंतर विचारले, आपणाला 'रणांगण'बद्दल काय माहिती आहे ? तिने विचारले,'रणांगण'? कारण तिच्या पीएच.डी.साठीच्या कादंबरीच्या स्पॅनच्या पलीकडील हा विषय होता. केवळ डिग्रीसाठी हा खटाटोप होता. ज्ञान मिळवण्याची आस बिलकूल नव्हती. तिच्या परीक्षकाने जर 'नाशिकमधील गाढवे व गाढवांचे प्रकार' या विषयावर प्रबंध लिहिण्यास सांगितला असता तर तोही तिने ह्या डिग्रीच्या कागदासाठी लिहिला असता---स्वतःचाही त्यात समावेश करुन ! आणि तो प्रबंध व ती बाई दोन्हीही बघण्यासारखे नव्हते हे आणखी एक नवल !

आज मला येथे सांगण्यात आले की पारितोषिके बरीच वाटायची आहेत, आपणांला त्रास नाही ना वाटणार ? परंतु मला यात कंटाळा नाही ! अहो त्यासाठीच तर मी येथे आलो आहे. आज येथे स्टेजवर येऊन मोकळेपणाने मुली संगीताची, खेळांची पारितोषिके घेऊन जात असताना मला आठवण होते ती आगरकर, फुले यांनी घेतलेल्या कष्टांची आणि झेललेल्या चिखलमातीची ! मग मला समोर त्या मुली दिसत नाहीत, पारितोषिके दिसत नाहीत, आणि एका निराळ्याच अनुभवविश्वात मी स्वत:ला हरवून बसतो.

माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. खरे म्हणजे गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र निश्चित ! पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची. आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे ! उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग कधी ती झाडांवर चढून बघ, तर कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण होत नसे. ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक लोखंडाची साखळी असते. ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने जाताना तो सारखा दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि खाली टाकून द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून पाहिला तर ती केव्हाच सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून परीस केव्हाच निसटून गेला होता. तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे. कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे बघण्यासच कोणी नाही."

साहित्यकार, लेखक होण्याची इच्छा असणारे अनेक तरुण माझ्याकडे येतात आणि मला विचारतात,आम्ही काय वाचू ? कशाचा प्रथम अभ्यास करु ? मी त्यांना सांगतो, बाहेर पडल्यापासून नाक्यावरच्या जाहिरातीपासून तुम्ही बघत चला. मग ती जाहिरात अगदी 'दो या तीन बच्चे बस !' ही जाहिरात असली तरी चालेल. परंतु फक्त तेच बघू नका. जीवनाच्या महान अर्थाकडे बघण्यास शिका आणि कशावरही लिहा. मग ते झोपडपट्टीचे वर्णन असो अगर एखाद्या ताजमहालाचे ! यावरुन मला मर्ढेकरांच्या एका कवितेवरुन झालेल्या वादाची आठवण होते. विषय होता 'उंदीर' ! त्यावर टीकाकार म्हणाले, एवढ्याशा उंदरावर काय कविता काय करायची ? दुसरे विषय नव्हते ? परंतु काव्यविषय हा त्याच्या आकाराच्या लहानमोठेपणावर ठरत नाही.असे असते तर प्राण्यामधील सर्वात मोठा प्राणी हत्ती आणि निसर्गातील सर्वात उच्च हिमालय ह्यांशिवाय काव्याला विषयच उरले नसते. मग गुलाबाच्या एखाद्या फुलावर किंवा पाकळीवर काव्यच झाले नसते. कारण ते फूल आकाराने लहान होते ना !

लायब्ररीत अनेक ग्रंथ असतात, पण त्यांतील माझे पुस्तक पाहण्याचा मला अजिबात धीर होत नाही. कारण त्यावर अनेक शेरे ठिकठिकाणी मारलेले असतात ! भिकार विनोद ! यापुढे लेखन बंद करावे ! ---कित्येकदा वा ! वा ! फारच सुंदर ! असेही लिहिलेले असते आणि मलाही वाटते नेमके तेच पान उघडले जाईल याची खात्री नसते. व्यावहारिक समीक्षकांच्या टीकेचे काही वाटत नाही. कारण टीका लिहून लिहून त्यांचे कातडे अगदी जाड झालेले असते ! पण तो त्यांचा व्यवसायच असतो. त्याविषयी ते करणार तरी काय बिचारे ! पण ह्या अशा उत्स्फूर्त शेऱ्यांना मात्र एक सत्याची फार मोठी किनार असते. ज्यातून मला फार शिकायला मिळते.

जीवनाच्या तीन अवस्था आहेत. तारुण्य, संयम नि निवृत्ती. तुम्ही तरुण विद्यार्थी जर एखादी सुंदर तरुणी जात असताना आकाशाकडेच डोळे लावून बसलात तर तो तारुण्याचा अपमान आहे. पण हे जाणूनही आपणांकडे नंतरच्याही अवस्था आहेत हे तुम्ही विसरुन चालणार नाही. 'मौनं सर्वार्थसाधनम' अशी पूर्वीच्या गुरुंच्या प्रेरेणेत शक्ती होती. परंतु आज तसे नाही. असले विचारधन अवलोकनाने आपण समृद्ध करायला हवे. गुरुंनी समजावून सांगायला हवे व ऐकणाऱ्याने ते ऐकायला हवे. मौनं म्हणजेच गुरुपण असते तर शिष्यालाच गुरु केले असते.

मला नेहमी विचारण्यात येते, कलावंत जन्माला यावा लागतो का? कलावंत जन्माला यावा लागत नाही. पण जगाकडे आपण सूक्ष्मपणे उघड्या डोळ्यांनी बघावयास हवे ! जे पाहिले ते सुंदर, आकर्षक शब्दांत सांगता आले पाहिजे ! जनतेची नाडी ज्याने पाहिली त्याला आपला अनुभव सांगण्याची ओढ असते. तेथेच कलावंत असतो.

ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी जिद्द हवी. केवळ विद्यार्थ्याबद्दलच नव्हे तर आपल्या सर्वच समाजाबद्दल माझी ही तक्रार आहे की, आपण जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट म्हणून ओरड होते. मी म्हणतो तरुण असंतुष्ट नाहीत तो काय देश आहे ? तरुणांनी असंतुष्टच राहिले पाहिजे. पण ते या अर्थाने की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारायचे.-"प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा" असे केशवसुतांनी सांगितले आहे. त्यातील 'लेणी' हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी चित्रे रंगवा असे म्हटले नाही. तर, कलानिर्मिती ही त्याहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही.त्यासाठी पत्थर फोडून त्याच्याशी झुंज द्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, एवढेच माझे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.

 --
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

Sunday, 27 October 2013

माहीती आहे का?

1) १९६५ साली पु.ल. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी 'पुलायन' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी 'पुलकित' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.

2) पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती'! त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन, एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय? पुण्यात 'गुळाचा गणपती' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं, सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!

3) लहानपणापासून पु.लं. च्या घरची आणि आजोळची वडीलधारी मंडळी त्यांची हौस पुरविण्यात उत्तेजन देत असत. संगीत आणि नाटक हे या मंडळींचे मुख्य छंद. लहानपणापासूनच पु. ल. पेटी वाजवायला शिकले. वयाच्या चौदाव्या वर्षी साक्षात् बालगंधवांसमोर पेटीवादन करुन त्यांनी त्यांची शाबासकी घेतली होती!

4) दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

5) साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमीया दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

6) मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर र्फॉर्मिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.

Sunday, 20 October 2013

अंतू बर्वा..

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळ-फणसांचे,खाजर्‍या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायु मिसळला आहे ते त्या रत्नांग्रीच्या विश्र्वेश्र्वरालाच ठाऊक.

अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे 'पडणे' हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहर्‍याचा

"'अण्णू' झाला काय रे?" म्हणून अंतू ओरडतो.

समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही. परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना, कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन 'अंतूशेट' हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले होते. पहिल्या महायुध्दाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले. परंतु 'अंतूशेट'व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. दोन वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची पाचपंचवीस, पोफळीची दहापंधरा आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. दोनपाच हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वाडवडिलार्जीत घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहीरीवर वहिवाटीचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतूशेट उभे आहेत.

त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि 'केसरी'च्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूशेटनी तडक प्रश्न केला होता, "

"वकीलसाहेबांचे जावई ना ?"

"हो!"

"झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा"

एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना. पण अंतूशेटनीच खुलासा केला. "तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारीत होता म्हणून."

"ठीक आहे !"

"केव्हा आलात पुण्याहून ?"

"परवाच आलो."

"बरोबर. दिवाळसण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी! काय?"

"तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा."

"वा! पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला! मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजीट ?"

"दोनतीन दिवसांनी जाईन !"

"उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं सहा महिने तळ ठोकला. शेवटी कपोसकर वकिलान् एक दिवस खळं सारवायास लावलं त्यास ! जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं ?"

"बरोबर आहे !"

"बापूशेट, ओळखलंत की नाही ? आमच्या वकिलांचे जावई ! आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो !"

हेगिष्ट्यांनी नमस्कार केला.

"चहा घेता ?"

"नको हो, उकडतंय फार !" मी म्हणालो.

"अहो, रत्नांग्रीस उकडायचंच. गोठ्यात निजणार्‍यान् बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय ?" शेवटला 'काय?' वरच्या पट्टीत उडवीत अंतूशेट म्हणाले, "रत्नांग्रीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला ? पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास ! दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअरकंडिशन हो !" मनमुराद हसत अंतूशेट म्हणाले. वर आणि "आमचा कंट्री विनोद हो जावयबापू" हेही ठेवून दिले.

"बापूशेट, पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहीतील एखादा फर्मास फार्स !"

अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?"

"करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात."

"म्हणता काय ?" हेगिष्टे माझ्याकडे 'अजि म्यां ब्रह्म पाहिलें' असा चेहरा करून पाहत म्हणाले.

"काय हो जावयबापू, एक विचारू काय ?" मिस्किल प्रश्नाची नांदी चेहर्‍यावर दिसत होती.

"विचारा की ----"

"एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला ?"

मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो; त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलो होतो.

"ते सिनेमा-सिनेमावर अवलंबून आहे."

"नाही, पण आम्ही वाचलंय की एक लाख दीड लाख मिळतात ..."

"मराठी सिनेमात एवढे कुठले ?"

"समजा ! पण पाच पूज्यं नसली तरी तीन पूज्यं पडत असतीलच ..."

"पडतात... कधीकधी बुडतात ही !"

"अहो, ते चालायचंच ! धंदा म्हटला की चढणं नि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय ? ...म्हणजे रागावणार नसलात तर..."

"छे, रागवायचं काय ?"

"सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं ?"

"हे जे काही म्हणजे ?" मी उगीचच वेड पांघरले.

"वस्ताद हो जावयबापू ! कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल ! अहो, हे जे काही म्हणजे तर्जनीनासिकान्याय यातला प्रकार म्हणतात ते..."

हा तर्जनीनासिकान्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतूशेतनी आपली तर्जनी नाकपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. "घ्या" अंतूशेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या ?" असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरवात केली. वास्तवीक त्या पो~याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आले असते. पण अंतूशेटचेच काय, त्यांच्या सा~या आळीचे बोलणे तिरके.

अंतूशेटचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या दहाबारा वर्षांत मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतले. एकदोनदा गंजिफा शिकवायचा प्रयत्नही केला. आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतूशेट आणि त्यांचे सांगाती यांचे जीवनविषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण,एका हातात दंडा नि दुस~या हातात फणस घेऊन , "रे गोविंदभट, टाकतोस काय दोन डाव ?" किंवा "परांजप्या, जागा आहेस की झाला तुझा अजगर ?" अश्या आरोळ्या मारीत पत्त्यांतले भिडू गोळा करणा~या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून, "जावयबापू, म्हणा एखादा मालकंस. गडबोल्या,कूट थोडा तबला पाव्हण्याबरोबर. खातूशेट, उघडा तुमचा खोका." असल्या फर्माईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असे.

"नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या !" ही दाद इथेच मिळे.

वर्षा-दोन-वर्षांतून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे.

"दामूकाका दिसले नाहीत कुठे अंतूशेट !"

"कोण ? दामू नेना ? तो चैनीत आहे ! वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान् वारा घालते म्हणतात."

"म्हणजे ?"

"अहो, म्हंजे वाघाचे पंजे ! दामू नेन्याची रत्नांग्रीहून झाली बदली !" असे म्हणून अंतूशेटनी आकाशाकडे बोट दाखवले.

"अरे अरे अरे ! कळलं नाही मला."

"अहो, कळणार कसं ? दामू नेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत ? केसरीत आला होता गृह्यसंस्कार झापून. मनमिळाऊ, प्रेमळ व धर्मपरायण होते असा ! छापणारे काय, द्याल ते छापतील. दामू नेना कसला प्रेमळ ? ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच ! एके रात्री उकडतांय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे ! पुण्यवान माणूस. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठालोकी. रत्नांग्रीत दोन पालख्या निघाल्या आषाढीला --- एक विठोबाची नि दुसरी दामू नेन्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यान् सीमोल्लंघन केलेनीत. अवघ्या देहाचं सोनं झालं. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय !" मिष्किलपणाने खांदा उडवीत अंतूशेट म्हणाले.

पाच फुटांच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायांत कोकणी वहाणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलायची खोड आणि ह्या साजासकट वजन सुमारे शंभर पौंड. ह्या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टींत एक गोष्ट ताजी म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यान् पिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी ! अंतूशेटच नाही, तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमीअधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला फुरश्यासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाहीच; वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही; खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू ! आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कुरकुरली नाही, आहे म्हणून वेगाने पळली नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्याघरच्या पिठाच्या दुधाची वाटी ! त्याच्या घरी दुधाचे पीठ झाले. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला. पण त्यातल्या खोब~याहून करवंटीची सलगी अधिक !

उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.

"कशी काय गर्दी ?"

"ठीक आहे !"

"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"

"छे ! छे !"

"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले.

मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."

"गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा."

"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"

"अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली. "नमस्कार हो जावयबापू..."

"नमस्कार !"

"काय जमलाय काय 'एकच प्याला' ? "

"ठीक आहे !"

"फुकट पासात की काय तुम्ही ? बाकी तुम्हीही त्यांतलेच. एक न्हावी दुस~या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात."

"'नाही हो. हे पहा तिकीट आहे."

"'मग 'ठीक आहे' म्हणून मुळमुळीतसं उत्तर दिलंत ? दमड्या मोजल्या आहेत ना तुम्ही ? तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला."

"अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी."

"सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता."

"पाहिलंत वाटतं नाटक ?"

"उगीच जरा. त्या कोप~यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे."

काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतूशेट निघून गेले. बाकी अशा दिवसरात्र 'पिंका' टाकीतच त्यांचे आयुष्य गेले. अंतूशेटची माझी आता इतक्या वर्षांची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे कधीच कळले नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाची उल्लेख आला.

"'म्हणजे ? अतूशेटना मुलगा आहे ?"

"आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !"

"'कलेक्टर ?"

"भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.

"मग वडलांना मदत करीत नाही की काय ?"

"अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलेला ..."

ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला.

"काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंधेची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आन्हिकंही चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून."

"अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?"

"पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !"

राजकारण हा तर अंतूशेटच्या अड्ड्यातला लाडका विषय ! प्रत्येक राजकीय पुढा~यावर आणि तत्वप्रणालीवर मौलिक विचार ! कोकणात दुष्काळ पडला होता. तसा तिथे नेहमीच दुष्काळ. पण हा दुष्काळ अंतूशेटच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'फ्यामिन आक्टान्वये पास झालेला'! दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतूशेटना विचारले, "काय अंतूशेट? भाषणास दिसला नाही !" "कुणाच्या न्हेरूच्या ? छ्याट् ! अरे, दुष्काळ पडला हितं .. तर भाषणं कसली देतोस ! तांदूळ दे.! हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणा~या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा हितं ... ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास ! तुम्ही आपले खुळे. आला न्हेरू चालले बघायास ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यास ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट ? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी."

मला नेहमी प्रश्न पडे, की ह्या मंडळीची आदराची स्थानं कोणती ? गावात पंडित आला की त्याला 'पढिक' म्हणून उडव. "बाजारात जाऊन पैशाचं लिंबू आणायास सांग. स्तंभाजवळच्या लायब्ररीत जाईल आणि तिथे मागेल लिंबू !" कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतूशेट चटकन म्हणाले, "सर्कशीत काय हो? पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होता." कुणी नवे दुकान काढले तर "दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागवून ठेव म्हणावं !" हा आशिर्वाद.

जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच !

कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही."

"म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?"

"ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं ! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, न्हेरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची !"

"मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला ?"

"खुळे की काय तुम्ही ! विश्वेश्वर घट्ट आहे राजिवड्यावर ! अहो, एक खेळ करून दाखवला त्यानं."

"दीडशे वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ ?"

"'अहो दीडशे वर्षं तुमची ! ब्रह्नदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय !"

कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते.

"बरोबर आहे !"

"उगीच तोंडदेखलं बरोबर आहे म्हणू नका त्या श्यामराव मुरकुट्यासारखं ! चुकत असेल तर कान उपटा ! तुम्ही माझ्याहून लहान खरे, पण शिक्षणान् थोर आहात."

अंतूशेटच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो. त्यांचे कुठेतरी काहीतरी जळत असते. गेल्या चारपाच वर्षांत रत्नागिरीला फार वेळा जाताच आले नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आले, डांबरी रस्ते आले, मी दोनतीन वर्षांपूर्वी गेलो तेव्हा अंतूशेटना म्हणालो,

"अंतूशेट, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची ! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज ?"

"छे हो, काळोख आहे तो बरा आहे. ! उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय ? दळिद्रच ना ? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं !"

अंतूशेट मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णू गोगट्या झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीही एकदोन मंडळी 'निजधामाला' गेल्याचे कळले. कधी नाही ती एक कारुण्याची नि गोडव्याची झाक अंतूशेटच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असाव्या. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर." अंतूशेट आपण होऊन सांगत होते. म्हाताऱ्याला काशीविश्वेश्वर, हरिद्वार-ह्रृषिकेश घडवून आणलंनीत. मावंदं घातलं जोरदार शंभू जोगळेकरान् ! गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शिलबंद करून आठवणीन् घेऊन आला माझ्यासाठी ! पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचं शिल फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावयबापू." पहिल्या भेटीतले संबोधन अजून कायम होते. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतूशेटच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता.

"वा वा ! कांग्रेचुलेशन हो जावयबापू ! कळलं आम्हांला. जाऊन या हो. एक रिक्वेष्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी."

"कसली रिक्वेस्ट ?"

"तेवढा कोहिनूर हिरा पाहून या. माझी आपली उगीचच तेवढी इच्छा राहिली हो ! पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा. शिवेल ! परत आल्यावर सांगा कसा दिसतो. लंडन, प्यारिस सगळं बघून या." मला उगीचच त्यांच्या पाया पडावे असे वाटले. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. "आयुष्यमान् व्हा ! श्रद्धाळू आहात, म्हणून यश आहे हो तुम्हाला."

मी निरोप घेतला आणि चार पावले टाकली असतील, लगेच हाक ऐकू आली.

"ओ जावयबापू --- !"

"काय अंतूशेट ?"

"जाताय ते एकटेच की सपत्नीक ?"

"आम्ही दोघेही जातोय."

"हे चांगलं केलंत ! उगीचच एक किडा आला डोक्यात. म्हटलं, परदेशी विद्या शिकायला निघाला आहात --- देवयानीची कथी आठवली. काय ? आमच्या मुलीलाही आशिर्वाद सांगा हो ! तुमचं भाग्य तिच्यामुळं आहे. तुम्हांला म्हणून सांगतो. मनात ठेवा हो. कुठे बोलू नका. चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतलाय एके काळी त्या आंब्याचा. पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं बघा. असो. सुखरूप या. इथून प्रयाण केव्हा ?"

"उद्या सकाळच्या एस.टी.नं जाणार !"

"डायरेक्ट मुंबई की काय ?"

"हे चांगलं केलंत ! एकदा तो प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणसांनी पृथ्वीप्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला --- अजून हाडांचा हिशेब जमवतोय. सातआठ हाडं हरवली म्हणतो त्या यष्टीत." अंतूशेट सगळे तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता.

पहाटे पाच वाजता एस.टी. स्टँडवर अंतूशेटची "जावयबापू" ही खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतूशेटनी वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हाती दिलीय.

"तुमचा विश्वास नाही, ठाऊक आहे मला. पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगारा आहे. विमानातून जाणार म्हणून कळलं वकीलसाहेबांकडून. एवढी पुडी जड नाही खिशाला."

एस.टी. सुटली आणि अंतूशेटनी आमच्या कुटुंबीयांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचे ते खपाटीला गेलेले पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीचच आघात करून गेले. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात.

 --
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

नाथा कामत..

नाथा कामत हे प्राणिमात्र माझ्या जीवनात का म्हणून आले आहे आणि दातांत काहीतरी अडकावे तसे का अडकून राहिले आहे, माझ्या मनात त्याच्याविषयी निश्र्चितपणाने कोणत्या भावना आहेत, याचा अजून माझा मलाच नीट उलगडा झालेला नाही या जन्मात होणार नाही.

"बाबा रे ! तुझं जग निराळं आणि माझं निराळं!" नाथा कामत कुळकर्ण्याच्या हॉटेलात हातातले भजे दोन्ही बाजूंनी राणीछाप रुपया निरखून पाहावा तसे उलटून पालटून पाहत मला अनेक वेळा हताश होत्साता सांगत होता. त्याच्या ह्या अशा वागण्यातल्या दोन गोष्टी मला आवडत नाहीत. एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहत खाणे. नाथा कामताला ही फार वाईट खोड आहे. अर्थात आपले सर्व उसासे, निःश्र्वास इ० माझ्यावर सोडण्यासाठी मला तो होऊन हॉटेलात घेऊन जात असल्यामुळे त्याने भजेच काय पण बटाटेपोह्यांतला प्रत्येक पोहा आणि मातीत सोने सापडावे तस्स दुर्मीळ मार्गाने सापडणारा बटाट्याचा एक-सहस्त्रांश तुकडा जरी निरखून पाहिला तरी मला त्याबद्दल तोंड उघडता येत नाही. पण दुसरी न आवडणारी गोष्ट मात्र तापदायक आहे. मला कुणी 'बाबा' शब्दाचे 'हे बाबा'. 'भो बाबा' किंवा 'बाबा रे' हे संबोधन वापरले की चीड येते. 'बाबा रे' ह्या शब्दाने वाक्याची सुरूवात करणारी माणसे ऎकणाराला एकदम खालच्या पातळीवर आणून बसवतात. 'बाबा रे' ह्या शब्दापुढे "वत्सा, तू अजाण आहेस.". "बेटा, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस", "हा भवसागर दुस्तर आहे.", "प्राण्या, रामकथारस पी" अशांसारखी अनेक वाक्ये गुप्तपणाने वावरत असतात.

नाथा कामताच्या वाक्यातला 'बाबा रे' हा एवढा तिरस्कारणीय अतएव त्याज्य जातीचा शब्द सोडला तर `त्याचं जग निराळं आणि माझं जग निराळं' ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. मी राष्ट्रभाषेत `गौ आदमी' किंवा अल्लाघरची गाय होतो. ("शुद्ध बैलोबा आहे" हे माझ्याविषयीचे ज्येष्ठ नातलगांतली चालू मत चिंत्य आहे.) मी अल्लाघरची गाय होतो आणि नाथा कामत हा-- अल्लाघरी असतात की नाही मला ठाऊक नाही, पण--अल्लाघरचा मोर होता. सदैव आपला पिसारा फुलवून नित्यनुतन लांडोरीच्या शोधात. त्यला घडवताना विधात्याने रोमियो, मजनू, फरहाद, हिररांझा ह्या पंजाबी नरमादीपैकी जो कोणी नर असेल तो, सोणीमहीवालमधला वाल किंवा महीवाल आणि क्लिंओपात्रा ते कान्होपात्रा ह्या व अशांसारख्या हजारो सुंदरींवर जीव ओवाळीत राहणे एवढेच कार्य केलेले जे जे म्हणून परदेशी व एतद्देशीय गडी होऊन गेले त्यांचे नकाशे संबंधित अधिका-यांकडून मागवले असतील आणि त्यानंतर नाथा कामत नावाचा पदार्थ तो विधाता करिता होऊन चार महिन्यांच्या शेपशयनी जाता झाला असेल.

कुठल्याही शहरवस्तीतल्या रस्त्यातून नाथा कामताबरोबर चालत जाण्यापेक्षा गोवीच्या वाळवंटातून भर दुपारी अनवाणी धावत जाणे अधिक सुखावह! पातळ, लुगडे किंवा स्कर्ट गुंडाळून द्र्ष्टिपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामताचे पंचप्राण डोळ्यांत येऊन गोठतात, गळ्यातले आदामचे सफरचंद सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचे यंत्र असते त्यातल्या बुडबुड्यासारखे खालीवर व्हायला लागते, मानेचा कोन उलटा फिरत तीनशेसाठ अंशांचा प्रवास करून येतो. आणि वस्त्रन्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की नाथाच्या बुटाला चाके लावल्यासारखा तो अधांतरी तरंगू लागतो. ह्या तुर्यावस्थेतून सहजभावात यायला काही मिनिटे जावे लागतात. मग आपल्या त्या टायने आवळलेल्या गळ्यातून `गटळळगर्रगम' अशांसारख्या अक्षरांनी वर्णन करता येण्यासारख्या आवाज काढून तो भानावर येतो.

नाथाची आणि माझी मैत्री ही एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी सारख्या नाहीत. माझे कपडे शिवणारा शिंपी तंबोऱ्याच्या गवसण्या, तबल्याच्या खोळी, उशांचे अभ्रे वगैरे शिवून उरलेल्या वेळात सद्रे, कोट वगैरे माणसे झाकायची कापडे शिवणारा; तर नाथाचा कोट कोटात शिवला जातो, पॅंट भायखळ्याला आणि शर्ट सॅंडहर्स्ट रोडवरच्या स्पेशलिस्टाकडे! त्याला मेट्रोला कुठले पिक्चर आहे, एलिझाबेथ टेलरची सध्या प्रकृती कशी आहे, रिटा हेवर्थ अधिक दाहक की जिना लोलिब्रिजीडा, ब्रिजित बार्दोची मापे, वगैरे गोष्टींचा लळा तर मी गावातल्या गावात व्यंकटेश टॉकिजमध्ये 'भक्त सुदामा' पाहणाऱ्यांपैकी! त्याच्या माझ्या वयांत खूप फरक आहे. तो आणि मी एका कचेरीत नोकरीला नाही तरीदेखील उभ्या गावाला आमच्या मैत्रीची माहिती आहे. गावकरी मंडळीना वास्तविक हे अजब वाटते. नाथा एरवी गावात फारसा मिसळणाऱ्यांतला नाही. तो देहाने पार्ल्यात असला तरी मनाने चौपाटीवर नाहीतर रेक्लेमेशनवर असतो. कारणपरत्वे हिंदू कॉलनीच्या गल्ल्यांत अथवा शिवाजी पार्कवर आढळतो. गिरगाव रस्त्याला खोताची वाडी जिथे 'टांग जराशी' मारते त्या नाक्यावर शनिवारी पाच ते साडेसहा ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी लावावी तसा उभा असतो.

त्याचा थोरला भाऊ गणपती आणि मी एका वर्गातले. पण नाथा आणि गणपती हे भाऊभाऊ आहेत हे केवळ वडिलांचे नाव आणि आडनाव तेच लावतात म्हणून खरे मानायचे. गणपती मॅट्रिक झाल्यावर महिन्याभरातच पोस्टात चिकटला आणि गेली कित्येक वर्षे लिफाफ्याला स्टांप चिकटून राहावा तसा पोस्टखात्याला चिकटून आहे.

आणि नाथाच्या मात्र शेकडो नोकर्‍या झाल्या. त्याने नोकर्‍या आधिक केल्या की 'प्रेम' हे सांगणे बिकट आहे. `नाथाच्या घरची उलटीच खूण' ही ओळ नाथा कामताच्या घराला सगळ्यांत जास्त लागू पडेल. वडील नाना कामत आणि आई आई कामत ही श्रावणबाळाच्या मातापितरांइतकी सालस. नाना कामत अनेक वर्षापूर्वी अकौटंट जनरलच्या हपिसातून रिटायर होऊन बसले. जवळच्या पुंजीतून आणि अलिबागजवळच्या खेड्यातली आपली वाडवडिलार्जित शेतीवाडी, घरदार विकून पार्ल्याला एक घर बांधले. त्यांच्या घराला कामतवाडी असे म्हणतात. ते एवढेसे घर आणि ती एवढीशी बाग ह्याला कामतवाडी म्हणणे म्हणजे उंदराला ऎरावत किंवा टांग्याच्या घोड्याला हयग्रीव म्हणण्यापैकी आहे. नाना कामत हा देवमाणूस; नाथाची आई म्हणजे तर केवळ माउली. गणपती पोस्टाच्या खांबासारखा निर्विकार. मांडीला तीनतीन वर्षे नवे धोतर न लावणारा. ह्या वयात चष्म्याच्या काडीला सूत गुंडाळणारा. पोरांच्या पाठीत हात वर करुन धपाटेदेखील न मारता येणारा. नंबर दोनचा सदाशिवदेखील तसाच. कुठल्यातरी आगीच्या विमा कंपनीत आहे, पण स्वभावाने जळाहूनही शीतळू! रस्त्यात हे भाऊ एकमेकांना दिसले तर मान उचलून वरदेखील पाहत नाहीत. त्यानंतरच्या भगीनी व्हर्नाक्युलर फाइनलापर्यंत शिकल्या, एके दिवशी बोहल्यावर चढल्या आणि सासरी गेल्या. शेवटला नाथा! हा मात्र अनेक वर्षे मुंजाच राहिला. अनेक पिंपळांवर बसला. पण ह्यालाच पिंपळांनी झपाटले आणि शेवटी एकदा---पण ती कथा पुढे येतेच आहे. "तुम्ही तरी आमच्या नाथाला काही सांगून पाहा--तुमचं त्याचं रहस्य आहे नाही म्हटलं तरी." नाना कामत डोळ्यांत पाणी आणून मला सांगत. आमचे घर टाकून चार घरे पलीकडे नाना कामतांची कामतवाडी.

"मी काय नाथाला सांगणार? तो जे जे काही सांगतो ते तुम्हाला सांगितलं तर पुढल्या महिन्याची पेन्शन आणायला जाणार नाही तुम्ही." हे सगळे मी स्वरात म्हणतो. उघड मात्र "बघू. अहो, लग्न हादेखील योग आहे" वगैरे वाक्ये असतात.

नाथा मात्र मला सारखे काही ना काहीतरी सांगत असतो हे खरे. माझ्या व्यक्तीमत्वात ही काय गोम आहे मला कळत नाही. माझ्यापाशी अनेक लोक आपली अंतःकरणे उघडी करतात. आमच्या गल्लीतले काका राऊत अगदी आतल्या गाठीचे म्हणून प्रसिद्ध आहेत. पण तेदेखील माझ्यापुढे ती गाठ सोडून बसतात. त्यांचा जावई (गुलाबचा नवरा) रामराव म्हात्रे याने खोताच्या वाडीत कुणाला तरी ठेवले आहे ही गोष्ट काका रावताने मला काही कारण नसताना सांगितली होती. वास्तविक काही गरज नव्हती. पण माझ्यापाशी प्रत्येक गोष्ट ही सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवल्याइतकी सुरक्षित राहते अशी पार्ल्यात (पुर्व बाजू) माझी ख्याती आहे. कदाचित ह्या माझ्या व्यक्तिमत्वाचा गुण म्हणूनच नाथा आपल्या सगळ्या दर्दभऱ्या कहाण्या मला सांगत असावा. त्याच्या वडील भाऊ गणपती मला अरेतुरे करतो म्हणून माझ्यापेक्षा सहासात वर्षांनी लहान असलेला नाथादेखील मला अरेतुरेच करतो.

गोष्ट सूक्ष्म आहे, पण मला जरा बोचते. रस्त्यात चालताना माझ्या खांद्यावर कोणी हात ठेवून चाललेले मला आवडत नाही. म्हणजे माझा खांदा हा शिवाजी किंवा थोरले बाजीराव यांनीच हात ठेवण्याच्या लायकीचा आहे अशासारखा अजिबात गैरसमज नाही माझा. पण एकूणच मला शारीरीक लगट करून दाखवलेली मैत्री आवडत नाही. आणि नाथा तर सारखा माझ्या कोटाच्या बटणाशी, पाठीशी, खांद्याशी चाळा करून बोलतो आणि वर पुन्हा ते `बाबा रे' चे व्रुपद!

नाथा कामत हा स्वतःविषयीच्या हजारो गैरसमजांचा दोन पाय फुटलेला एक होल्डॉल आहे. बायकांनी आपल्याकडे पाहिले रे पाहिले की त्या आश्रमहरिर्णी सारख्या विद्ध होतात असे त्याला इमानाने वाटते. `विद्ध'.`आश्रमहारिणी' वगैरे सगळे शब्द नाथाचे! त्याची शब्दसंपत्ती मात्र बृहस्पतीला त्याच्या आसनावरून खेचून काढील अशी आहे. आम्हीही आयुष्यात `स्त्री' हा पदार्थ पाहिला; पण नाथाने जसा पाहिला ते ज्ञात्याचे पाहणे. "नार्मा शिअररच्या डोळ्यांना हेडी लमारचं नाक लावलं आणि बेटू डेवीसची हनवटी चिकटवली की केशर कोलवाळकर होते", "क्लाडेट कोलबर्टची जिवणी. लिझ टेलरची पापण्या. इनग्रिड बर्गमनचा ओव्हरऑल गेट अप मिळून आणखी कोणाशीशी होते." असे त्याचे सिद्धांत आहेत. त्याचेही एक खास मित्रांचे वर्तुळ आहे. त्याला तो आपली गॅंग म्हणतो. त्या गॅंगमध्ये नाथाला कोणी `किलर' म्हणतात, कोणी `बायालॉजिस्ट' म्हणतात. नाथा अशा वेळी खूष असतो.

"बाबा रे---" नाथा मला सांगत असतो, "दोष माझा नाही. त्या दिवशीचीच गोष्ट घे! वेलकम स्टोअर्समध्ये मी ब्लेड्स आणायला गेलो होतो. शरयू पिना आणायला आली होती."

"कोण शरयू?" माझ्या या अज्ञानजन्य (की जनंक?) प्रश्नानंतर नाथाचे डोळे एकदम ऊर्ध्व लागल्यासारखे वर गेले. माझ्या सदतीस वर्षे पेश्नन भोगलेल्या एका काकांचे डोळे एकदाच असे झालेले मी पाहिले आहेत. त्यानंतर तासाभरातच मंडळींनी टापश्या बांधल्या. नाथाचे ते तसले डोळे पाह्यची मला सवय आहे. कुठली तरी सरला, विमला धरून तो कथेचा पुर्वरंग सुरू करतो आणि माझ्या "कोण सरला?". "कोण विमल?" ह्या न चुकता होणाऱ्या अजाण सवालांनंतर त्याला हटकून ऊर्ध्व लागतो. काही वेळाने डॊळे खाली उतरवून नाथा इहलोकात आला. आणि मेलेल्या उंदराकडे आपण ज्या दृष्टीने पाहतो तसे माझ्याकडे पाहत म्हणाला,

"पार्ल्यात इतकी वर्षे राहून तुला शरयू ठाऊक नाही? हे म्हणजे हॉलिवुडमध्ये राहून ग्रेटा गार्बो कोण हे विचारण्यासारखं आहे."

"नाथा, पार्ल्याला हॉलिवुड म्हणणं म्हणजे...जाऊ दे." खरे म्हणजे मला चटकन उपमा सुचली नाही.

"पण खरंच तुला शरयू ठाऊक नाही--- पार्ल्यात इतकी वर्षे राहून..."

"नाथा, शरयू म्हणजे काय पार्लेश्र्वराचं देऊळ आहे, की नामशेजारी खाणावळ की पार्ल्याच्या प्रत्येक सुपुत्राला ठाऊक! शिवाय तू म्हणतोस ती कुठली शरयू! पार्ल्यात सत्तर एक शरयू असतील."

"होय मित्रा....." हे एक त्याचे संबोधन मला आवडत नाही. पुंडरीकाने त्याचा तो चंद्रापिड का कोण होता त्याच्याशी बोलावे अशा थाटात तो मला--- माझ्या एतदविषयक अज्ञानाची कीव करताना--- `मित्रा' असे म्हणतो. "शरयू खूप आहेत, असतील, होतील---पण आताचा वर्ण्यविषय असलेली शरयू एकमेवाद्वितीयम!" नाथा बोलायला लागला की ऎकत नाही. "आणि ती तुला ठाऊक नाही?"

"नाही!" मी उत्तरलो. तू मुसलमान होतोस का?---ह्या औरंगजेबाच्या प्रश्र्नाला संभाजीने ह्याच धिटाईने उत्तर दिले असेल.

"तुझा दोष नाही, बाबा रे! तुझं जग निराळं आणी माझं निराळं!"

हे वाक्य मी त्यानंतर आणि त्यापुर्वी शरयू, कुमुद, शालीनी, बेबी, कुंदा अशा अनेक संदर्भात स्पष्टीकरणासह ऎकले होते.

"शरयू तुला ठाऊक नाही? सोनारी रोडवरच्या तो लांडगा ठाऊक आहे तुला?"

"लांडगा?" आमच्या पार्ल्यातला डुकरे, गाढवे, पाळीव आणि कुलुंगी कुत्री आणि कुणा अनामिक मारवाड्याच्या भर बाजारात ठाण मांडून ट्राफिक अडकवणाऱ्या आणि काही म्हाताऱ्या डोळ्यांना शेपटीची सोय करणाऱ्या गाई हा प्राणिसंग्रह मला परिचीत आहे. पण हौसेने लांडगा बाळगणारा गाढव पार्ल्यात राहत असेल अशी कल्पना नव्हती.

"कोण लांडगा?" मी पुन्हा विचारले.

"तो---भाईसाहेब प्रधान हे माणसाचं नाव धारण करून सबरजिस्ट्रार नावाचा हुद्दा मिरवणारा जंतू!"

अविवाहीत तरूणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून, शंकराकडून रुंडमाळा उसन्या आणून गळ्यात घालून नाचते.

"त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली आहे!" `भांगेत तुळस' ह्या मराठी वाक्र्पचारला एक तेजस्वी भावंड बहाल करीत नाथा कामत म्हणाला. मागे एकदा सरोज केरकर नावाच्या हृद्यदुखीच्या घराण्याच्या संदर्भात "बोंबलांच्या काड्यांच्या जुगड्यात केवडा आला आहे." म्हणाला होता. तिच्या बापाचा उल्लेख हिपॉपॉटेमस याखेरीज केला नाही. "बरं मी काय सांगत होतो---"

"लांडगा!" मी.

"हं. तर लांडग्याची मुलगी शरयू प्रधान!" टायचे गाठ सैल भांगातून करंगळी फिरवीत नाथाने कथा पुढे चालवली. "मी वेलकम स्टोअर्समध्ये ब्लेड्स घेतल्या. शरयूंन घेतल्या डझनभर. वेलकम स्टोअर्सचा शितू सरमळकर ठाऊक आहेच तुला!"

"मालक ना?"

"हो." पुढल्या बशीतले एक भजे चटणीत चिरडून शितू सरमळकराला चिरडल्याच्या थाटात नाथा म्हणाला. "बैल साला! ब्लेड्स हा पुरूषोपयोगी पदार्थ सोडलास तर बाकी सर्व स्त्रियोपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा हा एक पाजी इसम आहे हे पार्ल्यात तरी कोणाला सांगायला नको! त्याच्या दुकानात गुलाबाच्या ताटव्यासारखं बायकांचं गिऱ्हाईक फुललेलं असतं; पण हा कोरडा ठणठणीत आहे. नाकावर शेंदुर लावतो आणि कमरेखालचा देह साबणचुऱ्याची पिशवी भरल्यासारखा अर्ध्या विजारीत कोंबून बेंबीपर्यंत उघडी पैरण घालतो."

शितू सरमळकराचे हे वर्णन खरे आहे; पण त्याचा संदर्भ कळेना. नाथा तोंडाने थैमान घालीत होता.

"त्या शित्याच्या तोंडात देवानं बुटाची जीभ घातली आहे. चेहरा वीर बभ्रुवाहनासारखा!"

"तो मरू रे! शरयूचं काय झालं सांग."

"सांगतो." चटणीत भिजलेले भजे निरखून पाहत नाथा म्हणाला, "शरयूनं आपल्या छोट्याशा पर्समधून दहाची नोट दिली. आता दहा रुपये सुटे नाहीत हे वाक्य तू शितू सरमळकराच्या जागी असतात आणि तुझ्यापुढं शरयू प्रधानसारखी जाईची कळी पिना घेत उभी असती तर कसं म्हटलं असतंस?"

नाथा कामताशी बोलताना हा एक ताप असतो. अमक्या वेळी तू काय बोलला असतास? तमक्या वेळी तू कसे उत्तर दिले असतेस? मी कसे दिले असेल? ती काय बोलली असेल? ह्याविषयीचे माझे अंदाज तो माझ्या तोंडून वदवून घेतो.

"मी आपलं सरळ म्हटलं असतं : दहा रुपये सुटे नाहीत. पैसे काय पळून जाताहेत तुमचे? आणखी काय देऊ?"

"शाबास! म्हणूनच तू शितू सरमळकर नाहीस आणि तो गेंडा स्त्रियोपयोगी स्टोअर्स चालवतो. त्या राक्षसानं ती दहाची नोट शरयूच्या अंगावर फेकली आणि सर्दी झालेल्या रेड्यासारखा त्याचा तो आवाज--- तसल्या आवाजात

तिला म्हणाला: तीन दमडीच्या वस्तू घेता आणि धाच्या नोटी काय नाचवता? शितू सरमळकर हे वाक्य शरयू प्रधानला म्हणाला--आता बोल!"

मी काय बोलणार? मी आपला सर्दी झालेल्या रेड्याचा आवाज कसा असेल ह्याचे एक ध्वनिचित्र मनाशी ऎकण्याचा प्रयत्न करीत होतो.

"बोल! गप्प का? अशा वेळी तू काय केलं असतंस?" नाथा.

"त्या सरमळकराच्या काउंटरवर मूठ आपटून त्याच्या काउंटरची काच फोडली असती---"

हे वाक्य मी आपले नाथाला बरे वाटावे म्हणून म्हटले. एरवी शितूकाका सरमळकराविषयीचे माझे मत काही इतके वाईट नाही. त्याच्या दुकानात फुलणारा गुलाबांचा ताटवा मीदेखील पाहिला आहे. त्याला त्याचे निम्मे दुकान विस्कटायला लावून शेवटी पाच नया पैशांचीदेखील वस्तू न विकत घेता जाणारी ती गुलाबे त्याचे डोके कसे फिरवीत नाहीत ह्याचेच मला नवल आहे. तीन आण्यांच्या पिनांना दहाची नोट देण्यातली गैरसोय मला पटत होती. पण समोर नाथा फकिराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. माझ्या मुठीने सरमळकराच्या काउंटर फोडण्याच्या कल्पनेने त्याला खूपच समाधान झाले.

"बाबा रे! देअर यु आर! मी माझं अंतःकरण उघडं करून तुला ह्या साऱ्या गोष्टी सांगतो ह्याचं हेच कारण! तुझं माझं जग निराळं असलं तरी तुझी माझी वेव्हलेंग्थ जमते."

"वेव्हलेंग्थ?"

"म्हणजे माझ्या ह्रुदयात लागणारं स्टेशन तुझ्याही ह्रदयात लागू शकतं."

नाथा आता उपमांच्या शोधार्थ रेडिओ-विभागात शिरला होता. लगेच उसळून म्हणाला, "तू काच फोडली असतीस. मी त्याचं तोंड फोडलं!"

"म्हणजे मारामारी? त्या गेंड्याच्या कातडीला मी हात लावीन? मी शरयूच्या देखत बोललो त्याला..शित्या, तोंड संभाळून बोल. कोणाला बोलतो आहेस तू?"

माझी एकशे एक टक्के खात्री आहे की, शितू सरमळकराला नाथा असे काहीही बोलला नाही. एक तर शितू हा रोजच्या जेवणात ऑइलऎवजी 'क्रूड ऑइल' खाणाऱ्यांपैकी! त्याने नाथाच्या टाळक्यात पाच किलोचे वजन मारले असते. पण नाथा हे वाक्य हॉटेलात मात्र एवढ्या जोरात म्हणाला की, पलीकडच्या टेबलावरची माणसे चमकून माझ्याकडे पाहू लागली. त्यांचा उगीचच मीच 'शित्या' आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून मी चटकन म्हणालो,

"असं म्हणालास तू त्या शित्याला?"

मग ती माणसे पुन्हा निमूटपणे पुढले पदार्थ गिळू लागली.

"मग भितो की काय? लिलीच्या वेळची गोष्ट तुला मी सांगीतली होतीच..."

नाथा कामतच्या गोष्टी ह्या अरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक कथांसारख्या एकातुन एक अशा निघतात.

"लिली?" पुन्हा माझा अजागळ प्रश्र्न!

"बाबा रे ! जूनिअरला आमच्या वर्गात लिली पेंडसे नव्हती का? ब्ल्यू आइज! तिला वर्गात हसताना पाहून प्रोफेसर वाकणे नावाच्या संस्कृत शिकवणाऱ्या खोकडानं वर्गाबाहेर जायला सांगितलं होतं. त्या वेळी तिच्याबरोबर मी देखील सहानभुतिदर्शकवॉक-आउट केला होता. त्या खोकडाला वाटत होतं की, मुलं संस्कृत शिकायला येतात. लिली पेंडसेमुळं त्याच्या क्लासला स्टार व्हॅलू होती! वर्गात लिली नाही तर काय आहे! तुला मी ही हकीकत सेसिल रेस्टॉरंटमध्ये सांगितली होती."

"बरं आठवतं बुवा तुला---"

"तुला कल्पना नाही. त्या क्षणी माझ्या जीवनातला एक ड्रामा घडला होता. फॅमिलीरुमधून श्यामा चित्रे आणि मधू शेट्ये बाहेर पडले होते! तुला मी श्यामा चित्रे दाखवली होती--- ह्या गोष्टी तू विसरतोस कशा? श्यामा चित्रेनं शेट्याशी डायव्होर्स घेतला हे तुला ठाऊकच असेल."

"म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं?" काही तरी बोलायचे म्हणून मी बोललो.

"त्याशिवाय डायव्होर्स कसा होईल?" वास्तविक श्यामाची आणि मधूची मी ओळख करून दिली. श्यामा फर्स्ट इअरलाच रुतत होती. पण मी हात दिला. इंग्लिशच्या आणि सिव्हिक्सच्या माझ्या नोट्स वाचून पास झाली. माझं अक्षर पाहून आता तुला सांगायला हरकत नाही, पण कीप इट टु युवरसेल्फ---`असल्या अक्षराचा मुका घ्यावा असं वाटतं' असं म्हणाली होती."

मी उगीचच चमकून हे कोणी आजूबाजूला ऎकत नाही ना म्हणून पाहिले. माणसे भजी,बटाटेवडे वगैरे चेपण्यात दंग होती. नाथा मात्र पुन्हा एकदा ऊर्ध्व लावून बसला होता.

"....फर्स्ट एअरचा रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी चौपाटीवरच्या मावळत्या सुर्याला साक्ष ठेवून `मी तुला आजन्म विसरणार नाही, नाथा' असं टिळकांच्या पुतळ्याखाली वाळूत बसून मला वचन दिलं होतं. वादा किया था तुमने सिर्फ वादे के लिये...असं अर्बुज सुलतानपुरी म्हणलाय ते खोटं नाही."

एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे. `प्रेम' ह्या विषयात नाथाची मराठी-संस्कृत-फारशी-उर्दू ह्या सर्वांगाने तयारी आहे. अर्बुज सुलतानपुरी, सुराख चमनपुरी, उन्स उस्मानाबादी वगैरे अपसव्य लिपीत लिहीणारे कवी त्याच्या जिभेवर हाजिर असतात. किंबहुना, ह्या यवनांनीच त्याच्या प्रेमभंगाच्या सगळ्या तसबिरींना महिरपीसारख्या उर्दू ओळीच्या चौकटी पुरवील्या आहेत.

"तर मी काय सांगत होतो तुला?" नाथा भानावर आल्यासारखा म्हणाला.

"शितू सरमळकर!" मी त्या मुहब्बतीच्या मक्केच्या हाजीचे गलबत पुन्हा एकदा जुन्या बंदराकडे वळवीत म्हणालो. पण नाथा आता शरयूपार होऊन लिली पेंडसेला वळसा घालून श्यामा चित्रेच्या चिंतनात होता.

"शितू मरू दे! श्यामा!" टेबलावर बोटाने त्याने काहीतरी लिहिल्यासारखे केले. बहुधा श्यामा हे नाव लिहीले असेल. "काय सांगू तुला--बाबा रे! चौपाटीवर सुर्य मावळताना लाखो लोकांनी पाहीला असेल; पण मी पाहिला तसा कोणी पाहिला नसेल. श्यामा चित्रे पांढरं स्वच्छ वाइलचं पातळ नेसली, पांढरा ब्लाउझ,

गळ्यात पांढरी माळ, पांढऱ्या केसांत---आपलं केसांत .... पांढऱ्या जाईचा सर, मिश्र्चिफचा मंद वास---"

"कसला?"

"मिश्र्चिफ!"

"मिश्र्चिफ?"

"एक सेंट असतं."

"असं होय! काय पण नाव---"

"तिचं आवडतं सेंट होतं ते. आपल्या गुलाबी निमुळत्या लांब बोटांनी वाळूत नाथा कामत अशी इंग्लिशमध्ये अक्षरं काढीत टिळकांच्या पुतळ्याच्या बरोबर पायथ्याशी मला सांगत होती--`मी तुला जन्मात विसरणार नाही, नाथा..."

माझ्या मनात उगीचच विचार आला, चौपाटीवरच्या त्या वाळूत उभ्या उभ्या बळवंतरावजी टिळकांना काय काय म्हणून पाहावे लागले असेल!

"...आणि काय सांगू तुला? इंटरच्या वर्गात आम्ही गेलो. जिमखाना कमिटीच्या इलेक्शन जुलैमध्ये झाल्या आणि ही श्यामा चित्रे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मला विसरली. मधू शॆट्येच्या बॅडमिंटनवर भाळली. पण तिला ठाऊक नव्हतं की बॅडमिंटन कोर्ट म्हणजे लाइफ नव्हे. संसार एज ए डिफरंट थिंग! कॉलेजच्या पोर्चमध्ये माझ्या अंगावरुन जात होती, पण तिच्या एका दृष्टीक्षेपाला मी महान झालो होतो. वरच्या मजल्यावरच्या मधू शेट्ये तिला दिसत होता, पण समोरच्या पायरीवर उभा असलेला नाथा कामत दिसत नव्हता. वास्तविक कॉलेजच्या फिशपॉंड्मध्ये `नाथ हा माझा' हे गाणं म्हणा अशी तिला चिठी मिळाली होती. इंटरच्या गॅदरिंगला `मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला' ही चिठ्ठी मिळाल्यावर ती बेवफा मधू शेट्येकडे पाहून हसत होती असं मला शांता गोळेनं सांगितलं. मी गॅदरिंगवर बहिष्कार घातला होता. फक्त व्हरायटी एंटरटेन्मेंटच्या प्रोग्रामला गेलो होतो. शांता गोळेला मी प्रॉमिस दिलं होतं---"

"कसलं?"

"तिच्या भावगीतगायनाला मी पेटीचा सूर धरला होता."

"तू पेटीही वाजवतोस वाटतं, नाथा?" मी शांता गोळेला टॅंजंट मारून नाथाला दुसऱ्या दिशेला लावावा म्हणून म्हटले.

"नुसता सूर धरू शकतो." नाथाने प्रामाणिक कबुली दिली. "काळी पाच पट्टी होती तिची. `तू बोलल्याविना मी' गायली होती. शशी पाटणकर व्हायलिन दामू पर्वते तबल्याला आणि मी पेटीचा सुर! शांताचा आवाज म्हणजे--- बाबा रे! कल्पना नाही तुला. असला आवाज शतकाशतकात एखादाच येतो. टाचेपर्यंत लांब शेपटा होता तिचा---"

टाचेपर्यंत लांब शेपटा आणि शतकाशतकातला आवाज यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण एकाच फिल्मवर दोनदोनदा फोटो काढल्यावर होते तसले ते बोलणे ऎकण्यात मी सरवलो होतो.

"शांता गोळे म्हणजे.... तू नर्गिसचं फूल पाहिलं आहेस?"

"नर्गिस नावाचं फूल असतं हे मी प्रथम आज तुझ्याकडून ऎकतो आहे."

"तू उर्दू पोएट्री वाच! आहाहा!" कसल्या तरी आठवणीने मोरासारख्या आपलाच खांदा शहारवीत नाथा म्हणाला. "शांता गोळे म्हणजे चमनमध्ये बहार आल्यावर गुले नर्गिसवर शबेरात संपल्यावर पडलेलं शबनम होतं."

`हमारे बगीचे मे पैदा हुवा फुलदणाणा किंवा ओटो दिलबहार' यापलिकडे माझे उर्दू कधी गेले नव्हते. नाथाच्या वाक्यातले एक अक्षर मला कळाले नव्हते, तरीदेखील शांतापुराण नको म्हणून उगीचच मी म्हटले,

"आहाहा! काय सिमिली आहे!" पण माझ्या ह्या आदराने नाथा पेटला.

"बाबा रे! तू पाहिलं नाहीस तिला!" शी वॉक्ड इन ब्यूटी लाइक ए स्टारलिस्ट नाइट---" नाथा इंग्रजीत शिरला. "सेसिलमध्ये रात्री बारापर्यंत बसून मी सॉनेट लिहीलं तिच्यावर. त्या वेळी हॉटेलं अकराला बंद होत नसत. सद्या अभ्यंकर बसला होता माझ्यापुढं. त्यानं ती कविता टाइप करायला म्हणून नेली. त्याचा बाप सॉलिसिटर आहे. त्याच्या घरी टाइपरायटर होता. कविता टाइप केली आणि स्वतःची म्हणून पाकिटात घालून शांताच्या हातात दिली."

"हा शुद्ध हलकटपणा आहे!" मी तरी आणखी काय बोलणार!

"चलता है! चमन में बहार आयी तब बुलबुल रोया..." नाथा पुन्हा कुठल्या तरी उर्दू कवीच्या गोंड्याला लटकला.

"चालायचंच. चहा थंड होतोय बघ." मी त्याला पुन्हा एकदा पृथ्वीतलावर खेचला. पण नाथा अजून हिंदकळत होता. त्याला मेन लाइनीवर आणायचे म्हणून मी विचारले, "मग त्या शरयू प्रधानचं काय झालं?"

"हो!" झोपेतून जागा झाल्यासारखा नाथा म्हणाला. "शितू सरमळकराच्या अंगावर चार आणे भिरकावले. कीप द चेंज म्हणून सांगितलं. शरयूची नोट तिच्या हातात दिली. तिच्या स्पर्श झाला आणि बिटवीन यू ऍंड मी, तुला सांगतो, अक्षरशः महिरलो!"

"काय झालो?"

"माहिरलो."

मराठी भाषेत असले काही क्रियापद आहे याचा पत्ता नव्हता मला.

"माहिरलो? म्हणजे?"

"तुला महिरणं ठाऊक नाही?" एखाद्या भिकाऱ्याच्या फाटक्या गंजीफ्र्काकाडे पाहावे तसे माझ्याकडे पाहत नाथाने प्रश्र्न केला. "माहिरणं म्हणजे.... तुला कधी मुंग्या आल्या आहेत?"

"हो, खूप वेळा! वातामुळं होतं म्हणतात तसं!" मी इहलोक सोडायला तयार नव्हतो आणि नाथा सारखा आपला चंद्रलोकात!

"तुला वातामुळं होत असेल. तरूणीचा पहिला स्पर्श ज्याला झाला नाही, त्याला महिरणं काय ते कळणार नाही."

उगीच वाद नको म्हणून मी तो अपमान त्या लठ्ठ कपातल्या चहाबरोबर गिळला. तरुणीचा पहिला स्पर्श म्हणजे काय ते न कळायला मी काही जरठविवाह केला नव्हता. सुमारे चौदा वर्षापूर्वी डोळ्यांत पुढल्या होमाचा धूर जात असताना अजीर्ण झालेल्या बेडकासारख्या आवाजाच्या त्या भटजीने माझ्या शेजारच्या पाटावर बसलेल्या त्या तरुणीला "हं, हाताला हात लाव" म्हटले होते आणि त्या नवोढा की काय म्हणतात त्या नमुन्याच्या तरुणीने तुपाचा द्रोण होमात उलटा करताना माझ्या हाताला हात लावला होता. त्या वेळी माझ्या शरीराला आलेली झिणझिणी मी इतक्या वर्षात विसरलो नव्हतो. पण त्यालाच महिरणे म्हणतात हे मला काय ठाऊक!

"शरयूच्या त्या स्पर्शानं, बाबा रे! मी फुलुन आलो. आणि तिथून आमचा परिचय वाढला. तिच्याबरोबर शॆजारी बसून बेदिंग ब्यूटी पिक्चर पहिलं मेट्रोला! ती लांडग्याबरोबर आली होती. योग पाहा. तिच्या शेजारची खुबी माझी! लांडग्याच्या स्वप्नादेखील नसेल की आपल्या पलीकडे आपला भावी जावई बसला आहे. काळोखात मी हळूच तिच्या हातावर चॉकलेट ठेवलं. हात जरा खरखरीत लागला."

"म्हणजे तेवढ्यात तुझ्या शेजारी तो गेंडा बसला की काय येऊन?"

"लांडगा!" नाथाने माझी चूक सुधारली.

"मग?"

"अजून मी वेदिंग ब्यूटीचा पुढला भाग पाहिलाच नाही. उगीच सीन नको म्हणून कॅडबरीचं उरलेलं पाकीट टाकून निसटलो. प्रेमात फार सावध असावं लागतं. बाबा रे, तुला कळणार नाही. त्यानंतर बाजारात एकदा दिसली होती. तिच्याबरोबर लांडगा होताच. पिशवी हातात धरून शरयू उभी होती. पाठपोरी होती. पण तिच्या पाठीवरच्या दोन शेपट्यांच्या साइजवरून मी बरोबर ओळखलं-- की ही माझी फ्रेम!"

हे मात्र खरे आहे. काही माणसे गुळगुळीत नाण्यावरूनदेखील शक, सन, शतक, विक्रमराजा की शालिवाहन वगैरे गोष्टी ओळखतात, तसा नाथा शॆपट्याचा डौल, पिवळा गुलाब खोचायचा ऍंगल, सॅंडलच्या टाचा एवढ्या पुराव्यावरून ह्या गोष्टींच्या मालकिणीचे नाव ओळखतो. उद्या विलेपारले ते गिरगाव वॉर्डापर्यंतच्या तमाम तरूणी बुरखा घालून हिंडल्या तरी नुसत्या त्यांच्या टाचांवरून किंवा चालीवरून त्यांची नावे आणि घरनंबर सांगेल. सुमारे पंधरा ते पंचवीस वर्षाच्या समस्त तरूणीची त्याच्यापाशी संपुर्ण शिरगणती तयार असते. आयुष्यात विलेपारले ते चर्चगेट हा प्रवास त्याने एका लोकलमधून अखंड बसून केला नाही. गाड्यांना गर्दी नसे त्या काळातदेखील त्याचा पास फुटबोर्डावर उभा राहण्याचा होता. सांताक्रूझ आले रे आले की तो एकदम विंचू चावल्यासारखा "शारदा अमलाडी" म्हणत उतरे! खारला "देवकी कोठारे:, वांद्र्याला गुप्ते"! माहीम माटुंगा ही स्टेशने मात्र भाकड असतात हे लोकलच्या प्रवाशांना एकदम मान्य व्हावे. मग तिथून पुढे दादर आणि मग एकदम ग्रॅंटरोड! लोअरपरळ स्टेशनावर सुंदर तरुणी दिसणे हे तांबे आरोग्य भुवनात मटणपॅटिस मिळवण्याइतके दुरापास्त! `लोकलज्जेस्तव अप्रकाशित ठेवण्याचा खटाटोपदेखील करावा लागला असता. पटाईत कोळ्यांना कुठले नक्षत्र केव्हा उगवते हे जसे कळते तसे नाथा कामताला कोणत्या स्टेशनावर कोण उगवते हे पाठ होते. एकदा त्याच्या अमलाडी कालखंडात तो सांताक्रूझला उतरला नाही.

"का रे? आज तुझी अमलाडीबाई नाही वाटतं गाडीला?"

"यापुढं कधीच दिसणार नाही." नाथा हताशपणाने म्हणाला. "लग्न होऊन बंगलोरला गेली. तिचा नवरा गिरणीत वीव्हिंगमास्टर आहे. अशोक बेट्राबेट!" नाथाने शारदा अमलाडी हे खाते बंद करून टाकले होते.

नाथा कामत आता चाळिशीच्या आसपास आला तरी अजूनही खाती उघडतो. चार दिवस हिशेब मांडतो. मग एक दिवस खातेदार गळ्यात काळी पोत बांधून अदृश्य होतात. नाथा पान उघडतो. पण उस्ताह ओसरला नाही. आजदेखील कॉलेज उघडायच्या वेळी, जुन्या बायका अष्टसिद्धिविनायकाचे व्रत करून पालीचा, पुळ्याचा असे सगळे गणपती करून येतात तस्सा जून एकवीस ते तीसच्या आठवड्यात नाथा विल्सन ते रुइया चकरा मारुन `शिजन' कसा काय आहे ते पाहून येतो. अजूनही तो रोज गुळगुळीत दाढी करतो. हातरुमालावर सेंट टाकायला विसरत नाही. पॅंटची आणि शर्टाची इस्त्री जराही चुरगळलेली नसते. टायची गाठ नुसती पाहून घ्यावी. केस तुरळक होत चालले आहेत, कपाळावरून माघार घेत चालले, पण वळण तेच! तसाच चोपून काढलेला भांग. यार्डलेच्या ब्रिलियंटाइनची तीच तुकतुकी! तस्सा काटकोळा! हातावर फ्रेंच लिननचा कोट तसा टाकलेला. बुटाचे पॉलिश पावसातदेखील तसेच. चमकदार! कुठल्याही तेलाच्या, टूथपेस्टच्या, तयार शर्टाच्या, साबणाच्या किंवा गेला बाजार बूट पॉलिशच्या कंपनीने नाथाला अजून जाहिरातीसाठी का वापरला नाही कळत नाही. ओठावर मिशी कोरली तश्शी अजून आहे! त्याचे बौद्धिक आणि शारीरिक वय वाटेतच थांबलेय!

हे सगळे जरी खरे असले तरी आमच्या चौकस गावात एकाही माणसाने त्याला कुठल्याही चि०सौ० कां० बरोबर प्रत्यक्ष हिंडताना किंवा एखाद्या पोरीची टिंगल करताना पाहिले नाही. एखादी कविता वाचत जावे तसे तो तरूणींना आपदमस्तक वाचत जातो आणि मनाशी अन्वयार्थ लावतो. त्याच्या दृष्टीत पाप नाही. सारे गाव त्याला रोमिओ कामत म्हणते. पण त्याच्या वामांगी हाडामांसाची ज्युलिएट मात्र कधीच त्याला दिसली नाही. मला वाटते, त्याला त्याच्या त्या महिरण्यासाठी प्रत्यक्षात कधी कोणाही तरुणीचा हात धरावा लागत नाही. त्याचे पाळण्यातले नाव बद्रिनाथ. त्याच्या जन्मापूर्वी आई कामतांना बद्रिनाथाच्या यात्रेला जाण्याचे डोहाळे लागले होते असे ती हिला एकदा सांगत होती. ती माऊली अजूनही त्याला बद्रीच म्हणते. लौकिकातला नाथा तसा अनाथच राहिला होता.

पण त्याची तारुण्यपिटीका आजही मोडू, पण वाकणार नाही," शरयू प्रधानच्या लग्नाची पत्रिका घेऊन मला सांगत होता. कामतांच्या घराण्याशी आडनावाखेरीज काहीही साम्य नसलेल्या नाथाची मला आता दया येऊ लागली होती. नाथाच्या नामावळीतल्या एकूणएक कुलकन्यका आता `पुत्रवती बभूव' झाल्या होत्या. नाथाची आपल्या मिष्टरांशी ओळख करून देत होत्या. एक श्यामा चित्रेचा मधू शेट्याशी झालेला डायव्होर्स वगळला तर बाकीच्या साऱ्या जणी दिल्या घरी सुखी होत्या. आणि श्यामा चित्रेदेखील शेट्याशी काडीमोड घेऊन मेजर चोप्रा नावाच्या पंजाबी पहिलवानाशी लग्न करुन अंबाल्याला गेली होती. हा तपशीलदेखील नाथानेच मला दिला होता. `इलस्ट्रेटेड वीकली'त तिचा त्या धाटींगणाबरोबर आलेला फोटो दाखवून नाथा "शेवटी रानडुक्कर आवडला तिला!" असे मला म्हणाला होता. पण हे सगळे होऊनदेखील नाथा मात्र न कंटाळता तशीच गुळगुळीत दाढी करून स्नो चोपडीत होता, मिशी कोरीत होता, बुटांना आणि केसाला पॉलिश करीत होता आणि हातावर कोट आडवा टाकून कामतवाडीतून पार्ल्याच्या स्टेशनाचा रस्ता काटीत होता.

पूर्वी त्याला मी-चुकवीत असे, पण आता त्याची दया यायला लागल्यापासून त्याला मी होऊन हटकतो. पुष्कळदा एकच गाडी गाठायला आम्ही सकाळी निघतो. रस्त्यातून एखादे शिडशिडीत पातळ गेले की न चुकता नाथाची मान उलटी वळते.

"सुषमा नेने." नाथा तपशील पुरवतो. "डॉक्टर नेन्याची मुलगी. रुपारेलला आहे. डोळे छान आहेत---थोडेसे श्यामा चित्रेसारखे."

नाथाने राणा संगासारखे खूप घाव झेलले. पण श्यामा चित्रेचा घाव मात्र जरा खोल गेला आहे. कदाचित चौपाटावरची ती टिळकांच्या पुतळ्याजवळ वाळूत `नाथा कामत' ही इंग्रजी अक्षरे कोरण्याची गोष्ट खरीदेखील असेल. आणि नसली तरी खरी असू दे असे मला वाटायला लागले होते. नाथाच्या प्रेमजीवनातला मार्ग `वन वे' करण्यात देवाने त्याची फारच क्रूर चेष्टा केली आहे असे माझे ठाम मत आहे. तसा नाथा दिसायला वाईट नाही. अत्यंत टापटीप आहे. एरवी कामतवाडी म्हणजे गलथान; पण पोटमाळ्यातली नाथाची खोली नाथाने इतकी सुंदर मांडली होती की त्याच्या ह्या शेकडो पऱ्यांपैकी एखादी जरी तिथपर्यंत पोहचली असती तर नाथासाठी नव्हे तर त्याच्या त्या टापटिपीसाठी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली असती. छोट्याशा मेजावर फुलदाणी होती. भिंतीवर फक्त ग्रेटा गार्बोंचा एक फोटो होता. कॉटवर स्वच्छ चादर होती. मागल्या भिंतीवर बॅडमिंटनचे रॅकेट होती. तिला कव्हर होते. कामतांच्या घरात अशी फळीवर सोवळ्यातल्या लोणच्यापापडांच्या बरण्यांशेजारी डिंपल व्हिस्कीची भरलेली बाटली आढळावी तसे होते. कामतवाडीत एकदम विसंवादी दिसत होता.

आता मात्र वादळ निवळीत आले आहे तसे माझ्या ध्यानात आले. गेली तीनचार वर्षे नाथा एकाच नोकरीवर टिकला आहे. तो उत्तम स्टेनोटायपिस्ट आहे हे मलाच काय पण नाना कामतांनादेखील ठाऊक नसावे. शांता गोळेला त्याने लिहीलेली इंग्रजी कविता सद्या अभ्यंकराने टाइप करुन दिलेल्या तिरमिरीत त्याने टाइपिंग शिकून घेतले असावे. नव्या नोकरीत त्याला पगारही बरा असावा. हल्ली त्याने फर्स्टक्लासचा पास काढला आहे. संध्याकाळच्या जेवणाला आताशा पंक्तीला असतो. पुतण्यांना कॅडबरीचे चाकलेट वगैरे आणून देतो. नाथानेच त्यांना हे शिकवले आहे. भावांचे संसार फोफावत चालले आहेत. नाथा खाली मान घालून जेवतो आणि वरच्या खोलीत जाऊन स्वस्थ पडतो. केसांचे आणि बुटांचे पॉलिश आता केवळ आदतसे मजबूर चालत असावे.

एका रविवारी सकाळी आठाच्या सुमाराला फाटक उघडून नाथा माझ्या घरी आला. काहीतरी खाजगी बोलायचे आहे म्हणून त्याने मला बाहेर काढले.

"काय लग्नबिग्न जुळलंय की काय नाथाभाऊजी?" ही म्हणाली. मी हिला नाथमहात्म्य सांगितले होते.

"तुच शोधून काढ की एखादं चांगलं स्थळ!" मी त्याच्या देखतच तिला म्हणालो.

"अहो, स्थळं काय? छप्पन्न आहेत. पण त्यांच्या पसंतीला यायला हवं ना? त्यांना हवी असेल अपटुडेट बायको. आमच्यासारख्या काकूब्रॅंड कुठल्या पसंत पडायला----"

आमची ही तशी स्पोर्ट आहे.

नाथाबरोबर मी बाहेर पडलो.

"जुहूला जाऊ या." नाथा म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते गांभिर्य पाहून मीही काही न बोलता निघालो. रेल्वेचा पूल ओलांडून जुहूच्या वाटेला लागलो. रविवारी पहाटें उठून जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ओझोन की दोघांकडे पाहत होती.

"आजपर्यंत मी तुला माझी खूप सीक्रेटस सांगितली आहेत. श्यामा चित्रे तुला आठवत असेल."

"हो तर. चौपाटीवर तुझ्या नावाची अक्षरं---"

"शी इज डेड!" नाथा भरल्या आवाजात म्हणाला.

"म्हणजे?"

"आत्महत्या केली तिनं. आजच्या `टाइम्स' मध्ये आलंय! मेजर चोप्राची बायको बंदुकीची गोळी झाडून घेऊन..." त्याला पुढे बोलवेना. "मधू शेट्याशी मॅरेज केलं तेव्हाच मला वाटलं होतं. त्यातून हा तर आर्मीतला माणूस. त्यानं शुटदेखील केलं असेल तिला." नाथाने हातरुमाल काढून डोळे पुसले. सकाळी ह्या अशा प्रसंगी बाहेर पडतानादेखील हातरुमालावर सेंट टाकायला तो विसरला नव्हता. नाथाच्या माझ्या इतक्या वर्षाच्या परिचयात त्याच्या डोळ्यांत पाणी पाहिले नव्हते. तशा मी त्याच्या दृष्टीने अंतःकरणाला पीळ पाडणाऱ्या कितीतरी प्रेमकहाण्या ऎकल्या होत्या. पण इथे नाथा कामत माझ्यापुढे बसून चक्क रडत होता.

"चालायचंच! जीवनात..." असल्या प्रसंगी प्रसंगाला उचीत अशी वाक्ये बोलायला शिकवणारा एखादा पोष्टल कोर्स असला तरी मी तो घ्यायला तयार आहे. जुहूच्या वाळवंटात नाथा बोटांनी `श्यामा चित्रे' अशी इंग्रजीत अक्षरे काढीत होता. त्याचे इंग्रजी अक्षर इतके वळणदार असेल अशी कल्पना नव्हती मला! उगीच नाही श्यामा चित्रे म्हणाली अक्षरांचा मुका घ्यावासा वाटतो म्हणून! टिळकांच्या पुतळ्याला एखादे मिनीट जरी वाचा फुटली असती तरी मी "श्यामा चित्रे आणि नाथा कामताची भेट झाली होती का हो?" एवढाच प्रश्र्न विचारला असता.

सहा महिन्यांच्या आत मी नाथा कामताला बोहल्यावर चढवला. कुण्या वागळे नामक सज्जनाची बी०ए०, बी०टी० होऊन बरेच दिवस गोडाउनमध्ये पडून राहिलेली ठेंगणीठुसकी गासडी अंतर्पाटापलीकडे उभी होती. तिने नाथाच्या गळ्यात माळ घातली. नाना कामत आणि आई कामत ह्यांच्या वृद्ध डोळ्यांत आसवे तरारली.

मांडवात एका कोच्यावर नाथा आणि त्याची ती निम्म्याहून अधिक कोच अडवलेली भार्या बसली होती. विहीणीसारखी दिसणारे वधू पाहून मला उगीचच पापी माणसासारखे वाटत होते. मी त्याची नाव निष्कारण भवसागरात लोटायला निघालो आहे असा विचार मनाला खट्टू करीत होता. किंबहुना, त्यामुळेच की काय कोण जाणे त्याच्या अहेरावर मी चांगला पन्नास रुपये खर्च केला होता. अहेराचे बॉक्स त्याच्या हातात द्यायला मी पुढे गेलो. नवऱ्यामुलाचे लक्ष मांडवाच्या प्रवेशद्वारापाशी होते.

"कॉग्रॅच्युलेशन नाथा! मी त्याला भानावर आणले.

"थॅंक्यू." तो दचकुन म्हणाला आणि अभावितपणे पुटपुटला. "रेखा गोडबोले." मी मागे वळून पाहिले. गोडबोले वकिलांची मुलगी नाथाच्या लग्नाच्या मांडवात शिरत होती. कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत हे विसरून नाथा मला सांगत होता, "विल्सनला आहे. इंटरला."

"कोण आहे विल्सनला?" नाथाचे ते अर्धांग बोलले.

हल्ली नववधू कोचावर वराशेजारी बसून स्वतःच्या लग्नातदेखील बोलतात. आमच्या कार्यात आमच्या कलत्राने देवक बसवल्या क्षणापासून सूप वाजेपर्यंत गुडघात घातलेली मान पाहून तिला कुबडबिबड आहे की काय अशी मला शंका आली होती.

"ती गोडबोले वकिलांची मुलगी! ती लेमन कलरची साडी नेसली आहे.."

काही तासांपूर्वी चि०सौ०कां० मधून नुसत्या सौ० मध्ये आलेल्या बायकोला तो बिनदिक्कत माहिती पुरवीत होता.

"मी सुद्धा विल्सनलाच होते." वधू म्हणाली.

चारपाच दिवसांनंतर नाथा हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या फाटाकापाशी थांबला. सुटीच्या दिवशी सकाळी पायपुसणे झटकायची माझ्याकडे कामगिरी असते.

"न्यूज!" नाथा म्हणाला.

"कसली?"

"अरे, श्यामा चित्रे आणि माझी वाइफ एकाच वेळी कॉलेजमध्ये होत्या विल्सनला!"

माझ्या हातातले पायपुसणॆ खाली पडले. म्हणजे ह्या माणसाने गाफिलपणाने आपल्या प्रणयप्रकरणांची खातेवही त्या नववधू पुढे उघडली होती की काय?

"म्हणजे श्यामा चित्रे हा विषय तू आपल्या नव्या कोऱ्या बायकोशी बोललास?"

"मी नाही, तिच म्हणाली."

"ऍं?"

"मी इंटरला होतो ना, तेव्हा ती फर्स्ट इअरला होती. लेडीज कॉमनरुमध्ये इंटरच्या मुली श्यामा चित्रेला माझ्यावरून चिडवीत होत्या म्हणे. तिला सगळं आठवतंय---"

"मग ही मुलगी--- म्हणजे ही तुझी वाइफ--- त्या वेळी तुझ्या नजरेत कुठं भरली नाही ती---"

"बाबा रे, त्या वेळी श्यामा चित्रेपुढं मला सारी दुनिया झूट वाटत होती. जाऊ दे.... बुलबुलके गमका यह दास्तॅ-- बुलबुलने सुनाया और सुना भी बुलबुलने... जुम्मा मशीदी म्हणूनच गेला आहे." हातातल्या पिशवीला झोले देत नाथा म्हणाला.

"पण तू तुझं श्यामावर प्रेम होतं वगैरे काही बोलला नाहीस ना नाथा?" अनेक वर्षाचा सांसारिक अनुभव हातात पायपुसणे घेऊन होता.

"छे, छे! उलट मी तिला हसरत खंजिरीचा शेर ऎकवला. बुलबुलने गुल देखा---"

"हे बघ, मराठीत सांग." मी कासावीस होऊन म्हटले.

"म्हणजे चमनमध्ये बुलबुल गात होता. अनेक फुलं त्याच्याकडे आशेनं पाहत होती. आरजू करीत होती. इंतिजार करीत होती---"

"कसली झार?"

"इंतिजार--म्हणजे वाट पाहत होती. पण बुलबुल आपल्या गाण्यात मस्त होता. फुलं फुलली, कुस्करली, पण बुलबुलानं त्यांच्या एकही दाग दिलाला लावून घेतला नाही."

"काही समजलं नाही तू काय म्हणालास ते. पण तिला संशय नाही ना आला?"

"संशय? उलट खूष झाली. बाबा रे, बायकांच्या दिलाला फुंकर कशी घालावी हे तुला नाही कळणार." नाथा मला सांगत होता. हे म्हणजे एखाद्या माकडाने प्रभू रामचंद्राला सेतूत टाकता टाकता बायको कशी सांभाळावी ह्यावर प्रवचन देऊन टोचण्यापैकी होते. तेवढ्यात सायकवरून एक पातळ भुर्रकन गेले. मानेचा तीनशेसाठ अंशाचा कोन गर्रकन फिरवून नाथा म्हणाला,

"ललिता दिघे! काय कॉंफ्लेक्शन आहे! अच्छा!. जातो!"

नाथा निघाला. मी पायपुसणे अधांतरी धरून थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होतो. लगेच दहा पावले टाकून तो परतला आणि पिशवी माझ्या डोळ्यांपुढे नाचवीत पुसता झाला,

"साबुदाणे कुठं मिळतात रे?"

"साबूदाणे?"

"हो. वाइफला उद्या उपास आहे एकादशीचा..."

"किराणाभुसार-- मालाचं दुकानं अशी पाटी असलेल्या कुठल्याही दुकानात मिळतात. आणि हे बघ, शितू सरमळकराच्या वेलकम स्टोअर्समध्ये मिळत नाहीत. नाहीतर तिथं तुला दिसायचा एखादा ताटवा---"

नाथाचे लक्ष माझ्या बोलण्याकडे नव्हते. मघाशी सायकलवरून निघालेले ते ललिता दिघे की कुणाचे पातळ आता पदराच्या जोडीला शेपटा उडवीत उलट दिशेला वळले होते आणि नाथाची मान पुन्हा तीनसेसाठ अंशांच्या कोनात फिरली होती. आणि त्याच्या गळ्यातून पुन्हा तो आवाज निघत होता---`गट्ळळगर्र्गम'!

 --
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

रावसाहेब..

"दिल्ले दान घेतले दान पुढच्या जन्मी मुस्सलमान" असा एक आमच्या लहानपणी चिडवाचिडवीचा मंत्र होता. दिल्ले दान परत घेणा~याने मुस्सलमानच कशाला व्हायला हवे ? दानतीचे दान काही धर्मावारी वाटलेले नाही. पण 'दाना'ला मुस्सलमानातल्या 'माना'चे यमक जुळते, एवढाच त्याचा अर्थ. पण दिल्ले दान कसलाही विचार न करता परत घेणारा देवाइतका मक्ख दाता आणि घेता दुसरा कोणीही नसेल.

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, --- कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.

बेळगावच्या कृष्णराव हरिहरांशी अशीच गाठ पडली. त्यांना सगळे लोक 'रावसाहेब' म्हणायचे. ही रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केली नव्हती. जन्माला येतानाच ती ते घेऊन आले होते. शेवटपर्यंत ती सुटली नाही. बेताची उंची, पातळ पांढरे केस मागे फिरवलेले, भाग्याची चित्रे रेखायला काढतात तसले कपाळ, परीटघडीचे दुटांगी पण लफ्फे काढल्यासारखे धोतर नेसायचे, वर रेशमी शर्ट, वुलन कोट, एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटांत करंगळीच्या आणि अनामिकेच्या बेचकीत सिगरेट धरलेली, तिचा चिलमीसारखा ताणून झुरका घ्यायची लकब. जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही, दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज गृहस्थाचे एक वाक्य पुरे होत नसे. मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज.

साधे कुजबुजणे फर्लांगभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठल्याही वाक्याची सुरवात 'भ'काराने सुरू होणाऱ्या शीवीशिवाय होतच नसे. मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्तिप्रत्यय-कर्ता-कर्म-क्रियापदांची आदळआपट इतकी करायचे की, दादोबा पांडुरंग किंवा दामले-बिमले सगळे व्याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असेल तर समजो बापडे, पण जगाच्या दृष्टिने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता. आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते. काही माणसांची वागण्याची तऱहाच अशी असते. की त्यांच्या हाती मद्याचा पेलादेखील खुलतो, आणि काही माणसे दूधदेखील ताडी प्याल्यासारखी पितात. रावसाहेब षोकीन होते. पण वखवखलेले नव्हते.

जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल ? सोन्याच्या थाळीतून पहिला दूधभात खाल्लेल्या धनुत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किटप्पाने पुढच्या आयुष्यात कधीकधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता. पण काही हस्तस्पर्शच असे असतात, की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची घडण खानदारी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. अंतर्बाह्य ब्राँझने घडवल्यासारखा वाटे. वर्णही तसाच तांबूस-काळा होता. सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा होई. मग दहांतल्या पाच वेळा त्यांना जोरदार ठसका लागे. सिगरेट ओढतानाच काय, पण जोरात हसले तरी ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील बेंबीच्या देठापासून फुटायचे. स्मितहास्य वगैरे हास्याचे नाजून प्रकार त्या चेहऱ्याला मानवतच नसत. एकदम साताच्या वरच मजले.ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टूडिओत पडली.

दहापंधरा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रेकॉर्डींगच्या आधीची साफसफाई चालली होती. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजात गात होते. चाल थोडी गायकी ढंगाची होती. जोगांचा वरचा षड्ज ठ्यां लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर ह्यांच्या वर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडले --- "हा__ण तुझ्या आXX!"

ही इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी चमकून मागे पाहिले. बाळ गजबर रावसाहेबांना घेऊन पुढे आले आणि

मला म्हणाले ---"हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय ----"मी रीतसर नमस्कार ठोकला आणि रावसाहेबांनी आमची आणि त्यांची शाळूसोबत असल्यासारखा माझ्या पाठीत गुद्दा मारला.

"काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहेबांच्या तोंडची वाक्ये जशीच्या तशी लिहायची म्हणजे मुष्किलच आहे. शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेली माणसे अश्लील -- अश्लील म्हणून ओरडायची. (तबीयतदार तज्ञांनी फुल्या भरून काढाव्या.)

"वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं,

"कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें माइकचं बोंडूक वर उचलायला लावू या की. बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे xxxचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला.

स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः !

हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी आमच्या स्टुडिओतल्या मंडळींना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर लोक मनसोक्त हसत होते. रेकॉर्डिस्टने त्यांना आपल्या बूथमध्ये नेले आणि रावसाहेब त्या काचेमागून माना डोलवायला लागले. त्या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले.

त्यानंतर वर्षा-दोन वर्षांतच मी बेळगावला प्राध्यापकी करायला गेलो, आणि पहिल्या दिवशीच रावसाहेबांच्या अड्ड्यात सामील झालो. रावसाहेब सिनेमाथिएटरांच्या व्यवसायात होते. बेळगावच्या रिझ थिएटरातला बैठकीचा अड्डा हा रावसाहेबांचा दरबार होता. त्या दरबारात अनेक विसंवादी पात्रे जमत. त्या आर्चेस्ट्र्याचे रावसाहेब हे कंडक्टर होते. राजकारणातल्या माणसांना काय तो तिथे मज्जाव होता. म्हणजे कुणी मज्जाव केला नव्हता, पण त्या खुर्च्यांमध्ये मानाची खुर्ची नसल्यामुळे ती जात त्या दिशेला फिरकतच नसे. रिझ थिएटरच्या बाजूला एक ऑफिसची छोटीशी बंगली होती. तिच्या दारात संध्याकाळी खुर्च्या मांडल्या जात. पंखा चालू केल्यासारखी संध्याकाळी सहाच्या सुमारास नेमकी त्या बोळकंडीतून वाऱ्याची झुळूक सुरू व्हायची. एक तर बेळगावी लोण्याइतकीच तिथली हवाही आल्हाददायक. हळूहळू मंडळी दिवसाची कामेधामे उरकून तिथे जमू लागत. त्या बैटकीत वयाचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा, सत्तेचा -- कसलाही मुलाहिजा नव्हता. एखाद्या खिलाडू कलेक्टराचेदेखील रावसाहेब "आलं तिच्च्यायला लोकांच्यात काड्या सारून --" अशा ठोक शब्दांत स्वागत करायचे. रावसाहेबांच्या शिव्या खायला माणसे जमत. मग हळूच व्यंकटराव मुधोळकर रावसाहेबांची कळ काढीत. व्यंकटराव मुधोळकर धंद्यानं रावसाहेबांचे भागीदार. पण भावाभावांनी काय केले असेल असे प्रेम. दोघांची भांडणे ऐकत राहावी. एखाद्या शाळकरी पोरासारखे ते हळूच रावसाहेबांची कळ काढीत.

"काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय --" बस्स. एवढे पुरे होई.

"हं -- बोला काडीमास्तर --" रावसाहेब त्यांना काडीमास्तर म्हणत. ह्या दोघांची मैत्री म्हणजे एक अजब मामला होता. मुधोळकर कुटुंबवत्सल, तर रावसाहेबांच्या शिष्टमान्य संसाराची दुर्दैवाने घडीच विस्कटलेली. मुधोळकरांनी व्यवहारातली दक्षता पाळून फुकट्यांच्या भल्याची पर्वा करायची नाही तर रावसाहेबांनी विचार न करता धोतर सोडून द्यायचे आणि वर "लोकांनी काय पैसा नाही म्हणून नागवं हिंडायचं का हो !" म्हणून भांडण काढायचे. पण जोडी जमली होती. लोकांच्या तोंडी हरिहर - मुधोळकर अशी जोडनावे होती.

त्या अड्ड्यात शाळा आटपून मिस्किल नाईकमास्तर येत -- गायनक्लासातल्या पोरांना सा-रे-ग-म घोकायला लावून मनसोक्त हसायला आणि हसवायला विजापुरे मास्तर येत -- डॉ. कुलकर्णी -- डॉ. हणमशेठ यांच्यासारखे यशस्वी डॉक्टर येत -- कागलकरबुवा हजिरी लावीत -- पुरुषोत्तम वालावलकरासारखा तरबेज पेटीवाला "रावसाहेब, संगीत नाटकाचे जमवा" म्हणून भुणभुण लावी -- विष्णू केशकामतासारखा जगमित्र चक्कर टाकून जाई -- मधूनच रानकृष्णपंत जोश्यांसारखे धनिक सावकार येत -- बाळासाहेब गुडींसारखे अत्यंत सज्जन पोलीस अधिकारी येत -- मुसाबंधू येऊन चावटपणा करून जात... रात्री नऊनऊ वाजेपर्यंत नेमाने अड्डा भरायचा. पण सगळ्यांत मोठा दंगा रावसाहेबांचा. त्यांचा जिमी नावाचा एक लाडका कुत्रा होता. त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या कळत असाव्या. तोदेखील "यू यू यू यू" ला जवळ न येता "जिम्या, हिकडं ये की XXच्या " म्हटलं तरच जवळ यायचा.

सिनेमाच्या व्यवसायात रावसाहेबांचे आयुष्य गेले. मॅनेजरीपासून मालकीपर्यंत सिनेमाथेटरांचे सगळे भोग त्यांनी भोगले. पण पंधरापंधरा आठवडे चाललेला सिनेमादेखील कधी आत बसून पाहिला नाही. नाटक आणि संगीत हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय.

कर्नाटकातली वैष्णव ब्राह्मणांची घरे म्हणजे अत्यंत कर्मठ. त्या एकत्र कुटुंबातल्या सोवळ्या-ओवळ्यांच्या तारेवर कसरत करीत पावले टाकायची. त्यातून रावसाहेबांचे वडील म्हणजे नामवंत वकील. वाड्याच्या त्या चौदा चौकड्यांच्या राज्यातली ती त्या काळातल्या बाप नामक रावणाची सार्वभौम सत्ता. पोरे ही मुख्यतः फोडून काढण्यासाठी जन्माला घातलेली असतात, असा एक समज असायचा. नफ्फड बापदेखील आपल्या पोराला सदवर्तनाचे धडे द्यायला हातात छडी घेऊन सदैव सज्ज. इथे तर कर्तबगार बाप. घर सोन्यानाण्याने भरलेले. असल्या ह्या कडेकोट वातावरणात विष्णुसहस्त्रनामाच्या आणि तप्तमुद्रांकित नातलगांच्या पूजापाठांच्या घोषात कृष्णरावांच्या कानी बेळगावच्या थिएटरातल्या नाटकांच्या नांद्यांचे सूर पडले कसे हेच मला नवल वाटते.

...अपुर्ण..

 --
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

नारायण..

नारायण

"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"

"नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर ---"

"नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? -- काय हे?"

"नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली ---"

"नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ ---"

"नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून ---"

"नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून ---व्य़ाही पेटलाय !"

"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"

पन्नास ठिकाणाहून पन्नास तऱ्हेचे हुकूम येतात आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने परत करीत उभा राहतॊ.

'नारायण' हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतॊ. कुठल्याही समारंभाला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून-ना-कुठून-तरी नातें लागणारा नातलग घरातं कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतॊ .

---ज्या दिवशी मुलगी पाह्यला म्हणून मंडळी येतात --- मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका (हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेले कौटुंबिक कोडें आहे.),

नवरा मुलगा आणि मुलाचा मित्र. ह्या मंडळीत आठनऊ वर्षाची एखादी जादा चुणचुणीत मुलगीहि असते. आणि मग तिच्या हुषारीचं मुलीकडील मंडळी बरंच कौतुकहि करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्यामुलाकरून चा मित्र समोरच्या बिऱ्हाडातून जरासा पडदा बाजूला करून पहाणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेऊन असतो. आंतल्या भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकींवर ठसवत असतात. मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! -- कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ?

भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. नवरी मुलगी नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. तिच्या कपाळावरचे धर्मबिंदु टिपण्यांत तिच्या बहिणी वा मैत्रिणी दंग असतात. आणि ती आठनऊ वर्षाची 'कल्पना', 'अर्पिता' किंवा कपर्दिका असल्या चालू फ़ेशनच्या नांवाची मुलगी कपाट उघडून त्यातल्या पुस्तकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतकी का आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको म्हणते -- बिस्कीटाला हात लावत नाही -- लाडू 'मला नाही आवडत' म्हणते; एकूण स्वत:च बरंचसं 'कौतिक' करून घेते. ' कार्टीच्या एक ठेवून द्यावी' असा एक विचार मुलीच्या आईच्या डोक्यात येतो आणि 'भारीच लाडोबा करून ठेवलेला दिसतोय' हा विचार नवऱ्यामुलीलाही शिवून जातो.

एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या विंचारात दंग असतां एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विषेश लक्श जात नाही. सुरवातीला मुलाच्या बापाने 'हा आमचा नारायण' एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि 'नारायण' संस्था ह्याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहील्याशिवाय कळू शकत नाही.हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. मागल्या बाजूने मुलाण्याच्या कोंबड्या ठेवायच्या पेटाऱ्यासारखा ह्यांच्या धोतराचा सायकलच्या सीट मधे अडकून-निसटून बोंगा झालेला असतो. धोतराची कमालमर्यादा गुडघ्याखाली चारपाच बोटें गेलेली असते. डोक्याला ब्राउन टोपी असते. खाकी, ब्राउन वगैरे मळखाऊ रंग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण घेताना कशी होती हें सांगणे मुष्किल असते. कारण तीचा अंगठा, वादी, पट्टा, हील, सगळे काही बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परंतु उजव्या पायाचा आंगठा उडलेला असला म्हणजे नारायणला विषेश शोभा येते. आमचा नारायण सहसा कोट घालत नाही. एकदा स्वत:च्या लग्नात, एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पहायला जाताना आणि एकदा मुन्सिपाल्टीत चिकटवून घेतलेल्या सदूभाऊंना कचेरींत भेटायला गेला त्यावेळी त्याने कोट घातलेला होता. घरोघरचे नारायण, कोट असा सणासुदीलाच घालतात. कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टीपिन लावतात. ही दात कोरायला अगर वेळप्रसंगी कोणाच्या पायात काटा रूतला तर काढायला उपयोगी पडते. खाकी सदऱ्याच्या मात्र दोन्ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाईमटेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचें बसल्या बैठकीला जमले की मुहुर्ताची बोलणी सुरू होतात आणि गाडे पंचांगावर अडते. आणि इथे नारायण पुढे सरसावतो.

"हे पंचांग ---" नारायण कोटाच्या खिशांतून पंचांग काढीत पुढे येतो.वा !! कृतज्ञ चेहऱ्याने वधूपीता नारायणाकडे पहातो.

इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आंतल्या बायकाही प्रसंगावधानी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे कुठेच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही ! आता चारी दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत "नारायणाला घ्या हो बरोबर" असा आग्रह होत असतो."मी सांगतो तुम्हाला, शालू भड्सावळ्यांच्या दुकानाइतके स्वस्त दुसरे कुठे मिळणार नाहीत." सुमारे आठनऊ निरनिराळ्या वयाच्या (आणि आकाराच्या) बायकांसह नारायण खरेदीला निघतो. सातआठ पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणें म्हणजे मन:शांतीची कसोटी असते; पण नारायण आठ बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्याची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बस मध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे-उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरींत त्याचें लक्ष नाही. (तिथे क्वचितच लक्ष असतें परंतु ती उणीव हेडक्लार्कच्या घरी चक्का पुरवणें, मटार वाहून नेणे इत्यादी कामांनी भरून निघते.) एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगांत लग्न चढतें."काकू तुम्ही माझ ऎका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक द्रौपदी वस्त्रभांडारात आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा." मालकाच्या तोंडासमोर ही वाक्ये बोलायचे त्याला धैर्य आहे. बोहोरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर, ब्राउन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे."बरं बाबा ---" काकू शरणचिठ्ठी देतात."

मामी ----- काकूंना खण पाहू दे, तोंपर्यंत नरहरशेटच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ---""हो आंगठीच ही माप आणलय जावईबुवांच्या ---"

"आंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठी टाकूं. मी काल बोललोय त्याला. आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी आंगठी --- सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय (ते ही त्याला ठाऊक आहे.) आज सोन्याची खरेदी होऊं द्या --- चला." निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणामागून निघतात. गल्ली-बोळातून वाट काढीत त्यांना नरहरशेटजींच्या दुकानी नारायण नेतो."आंगठीचंही इथंच .... म्हणत होते" ----- अशी कुजबुज करण्याचा मामी प्रयत्न करतात. पण नारायण ऎकायला तयार नाही."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ ---""चारपाच दिवसात या --""हें असं अर्धवट नको -- नक्की तारीख सांगा -- मला सतरा हेलपाटे मारायला सवड नाही ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील 'हाड' म्हणायची ताकद नसते. पण इथे अपील नाही. आता लग्न उभे राहिले आहे. आणि ते यथास्थित पार पाडणे हें त्याचे कर्तव्य आहे -- त्याच्यावर जबाबदारी आहे. गेल्या चार दिवसात त्याला दाढीला सवड नाही त्याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यानंतर मोर्चा परत कापडदुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत --- नारायण डगमगत नाही."

काकू -- मी सांगतो --- हं हे घ्या पंचवीस -- ह्यांतले निवडा आठ -- हे चार जरीचे -- हा मुलीच्या सासूला होईल ---"

"पण गर्भरेशमी असता तर --"

"काय करायचाय म्हातारीला गर्भरेशमी ?--"

सर्व बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऎकून मनसोक्त हसतात.

"झालं --- हे साधे घेऊन ठेवा -- एक बारा --"

"बारा काय करायचे आहेत ?" काकू शंका काढतात."लागतात -- लग्न आहे सोमवारी.

त्या दिवशी बाजार बंद --- आयत्या वेळी खण काय, सुतळी मिळायची नाही वीतभर --

" नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचें कौतुक होतें."हे बरीक खरं हो ! ---" कापडाचोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यांतली एक आत्या उद्गारते. "आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीणबाई आयत्या वेळी अडून बसल्या नवऱ्या मुलाला हातरूमाल हवेत म्हणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच आणले बाई कुठूनसे," नारायण फुलतो."

क्यांपापर्यंत सायकल हाणत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्यापुढे --- पूस म्हटलं लेका किती नाक पुसतोस ह्या हातरूमालांनी तें ! हां ! तसा डरत नाही -- पण मी म्हणतो, आधीपासून तयारी हवी --- काय गुजामावशी ? "

"गुजामावशी आपलंही मत्त आगदी नारायणासारखंच आहे असं सांगतात आणि बारा खणांची आयत्या वेंळी असूं द्या म्हणून खरेदी होते ---"खरंच बाई पंचे घ्यायला हवे होते---"

"पंचांचं मी बघतो---तुम्ही ही बायकांची खरेदी पाहा----हां ! खण झाले, शालू झाले, आता अहेराची लुगडी---चला पळसुले आणि मंडळीत---"

"पळसुल्याकडे का जायचं ? मी म्हणत होतें जातांजातां सरमळकरांच्या दुकानी जाऊं----सरलच्या लग्नांत तिथनंच घेतलीं होतीं लुगडीं---"

"त्यावेळीं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वर्षांपूर्वी वारले ते---चिरंजीवांनी धंद्याचा चुथडा केला---आता आहे काय त्यांच्या दुकानात ? पोलक्याचीं छिटंदेखील नाहीत धड--"एकूण नारायणाला फक्त दुकानांची माहिती आहे असं नाही. त्याला दुकानदारांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थितीहि ठाऊक असते."बरं अत्तरदाणी----आणि चांदीचं ताट अन वाटी---"मामींना ह्यापुढले वाक्य पुरेंहि न करू देतां नारायण ऒरडतो,"चांदीचा माल शेवटीं पाहूं---आधी कापडाचोपडाचं बघा. नमस्कार---"नमस्कार 'पळसुले आणि मंडळी, कापडाचे व्यापारी, आमचे दुकानी इंदुरी, महेश्वरी इ. इ.' यांना उद्देशून केलेला असतो."नमस्कार, या नारायणराव----"

"हं काकू, मामी, पटापट पाहून घ्या लुगडीं---"

" नारायण कंपनी कमांडरच्या थाटांत हुकूम सोडतो."अरे ह्यांना लुगडी दाखवा--"

"आमच्या मामेबहिणीचं लग्न आहे !"

"हो का ?" पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. "तुमचे मामा म्हणजे .."

"भाऊसाहेब पेंडसे----रिटायर्ड सबडिविजनल ऑफिसर---"

"बरं बरं बरं ! त्यांच्या का मुलीचं लग्न ?---" वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब कांहीही आलेलें नाही, पण

"अरे माधव, त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टॉक आलायं तो दाखव, " असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. बायका 'ह्या नारायणाची जाईल तिथे ओळख' ह्या कौतुकित चेहेऱ्यानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो."हं शालूबिलूची झाली का खरेदी ?"

"होतेय" ----नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागून देत नाही.तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रणपत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अथवा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरतं असते.

"इंग्रजी कशाला ?" नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे. ह्या इंग्रजीच्या पेपरानेच मॅट्रिकच्या परीक्षेंत त्याला सारखे धक्के दिले होते ! वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही---खाली 'आपले नम्र' ह्यांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सारें सारें काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूट्पणे ऎकतात."उद्या संध्याकाळी प्रुफें येतील ! नीट तपासा नाहीतर त्या अण्णूच्या लग्नांत झाली तशी भानगड नको व्हायला---"

"कसली भानगड ?" स्त्रीवर्गाकडून पृच्छा होते. धोतराने टोपींतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नांत सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो."अहो काय सांगू काकू---" ( ह्या काकू म्हणजे कापडखरेदीला गेलेल्या काकू नव्हेत----त्या येवल्याच्या काकू---- ह्या अंतूच्या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अण्णू आपला----"" म्हणजे भीमीचा भाचा ना----ठाऊक आहे कीं---धांद्रटच आहे मेलं तें एक---" काकू कारण नसताना अण्णूला धांद्रट ठरवतात."तेच ते ! अहो त्याचं तिगस्त सालीं लग्न झालं---"

"अरे जानोरीकरांची मेहुणी दिलीय त्याला---" कुणीतरी एखाद्या प्रभाताई उद्गारतात."हें तूं सांगतेस मला ? ----- मी स्वत: ठरवलं लग्न ! मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता अण्णू कानाला धरला आणि उभा केला बोहल्यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---त्याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोणेश्वर प्रेसमध्ये--- मी म्हणत होतों आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयांत घ्या--- पण नाही ऎकलं माझं--- मी म्हटलं मरा---"

"अय्या !" 'अय्या'च्या वयाची कोणी तरी मुलगी 'मरा' ह्या शब्दानं दचकून ओरडली."अय्या काय ?----भितो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी त्याला वार्न केलं होतं की, गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटकसिनेमाचीं तिकिटं आणि तमाशाची हँडबिल छापणारा----तो निमंत्रणपत्रिका छापणार काय डोंबल? पण नाही---आणि तुला सांगलो काकू, पत्रिका छापून आल्या नि जोड्यानं मारल्यासारखी बसली मंडळी---""म्हणजे ?""सांगतो ! " नीरगाठं-उकलीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो."---पत्रिका आल्या बरं का----पोष्टांत पडल्या----मी आपली सहज पत्रिका उघडून पहातों तर पत्रिकेच्या खाली 'वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणेचे करावें' असं असतं की नाही ? तिथं 'तिकीटविक्री चालू आहे' ही ओळ छापलेली---"सर्व बायका मनमुराद हसतात----"जळ्ळं मेल्याचं लक्षण ! अरे लग्न म्हणजे काय शिनिमा वाटला की काय तुझ्या गोणेश्वराला---"

"सारांश काय ? पत्रिका उद्या येतील त्या नीट तपासा----नाहीतर एक म्हणतां एक व्हायचं चला मी निघतो."

"तू कुठे निघालास उन्हाचा-----चहा घेऊन जा थोडा---"

"इथे चहा पीत बसलों तर तिथे आचा-यांची आर्डर कोण देईल ? नाना तेरेदेसायाला भेटतों जाऊन."

"नाना तेरेदेसाई कोण ?"

"अग तो चोळखण आळींतला----स्वयंपाकी पुरवायचं कंत्राट घेतो तो---"

"पण मी म्हणत होते नारायणा----की आपलं एकदम चारशें पानांचं कंत्राट द्यावं---" एक उपसूचना."छे छे ! महागांत लागेल. तेरेदेसाई हा बेस्ट माणूस आहे--- चार आचारी पाठवील---वाढायचं आपण बघूं...." लगेच टोपी चढवून नारायण चोळखण आळीच्या दिशेला सायकल हाणू लागतो---आणि खुद्द लग्नाच्या दिवशीं नारायण म्हणजे डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालत असतो. आज त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात----आणि एका हातांत केळीच्या पानांचा बिंडा, बगलेत केरसुणी (बोहलं झाडायला), खिंशातून उदबत्यांचा पुडा डोकावतो आहे, एका हातात कुणाचं तरी कारटं धरलं आहे आणि तोंडानं क्रिकेट कॉमेंटरीच्या वेळीं रेडिओ जसा अविश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे."हं भटजी, ही केरसुणी---पांड्या, बोहलं स्वच्छ झाडून घे---कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर ? मला कशाला बोलावताहेत ?

त्यांना म्हणावं इकडे या.... वसंतराव, पॅण्ट सोडून धोतर नेसा बघूं झटपट---देवक बसायला पाहिजे एव्हाना...काकू, बॅण्ड संध्याकाळी---आता सनई चौघडा--- बरोबर सात वाजतां हजर आहेतं इथं सनईवाले ! तुम्ही चिंता नका करूं--- बायकांचा फराळ आटोपला की नाही?... किल्ली ? काय हवं आहे ? ताम्हन मी देतो---किल्ली नाही मिळायची...हं---- या तेरेदेसाई---मथूमावशी, ते आचारी आले---तुम्ही चला सरळ---काय ?---टांग्याचं भाडं ?--देतों मी, तुम्ही जा.. चोळखण आळींतून इथपर्यंत रूपाया तीर्थरूपांना मिळाला होता तुमच्या---आठ आण्यावर दमडी नाही मिळाणार...हं---हे घ्या दहा आणे---चला...तुम्ही कुठे निघालां ग--- सरल, आता नाही जायचं कुठे---हं---

"प्रत्येकजण नारायणाचा सल्ला घेतं असतं---काम सांगत असतं---त्याची चेष्टाही करीत असतं---एवढं सगळं करून प्रत्यक्ष 'लग्न' ह्या घटनेंत त्याला कांहीच 'इंटरेस्ट' नसतो. कारण इकडे मंगलाक्षता वधूवराच्या डोक्यावर पडत असतांना एखाद्या कुर्यात सदा मंगलमला चार मंगलाक्षता उडवून तो एकदम जो निसटतो---तो आंत पानं मांडायला. उदबत्यांचा पुडा त्यालाच कुठे ठेवला आहे तें ठाऊक असतं---रांगोळी ओढायची दांडी त्याने नेमक्या वेळीं सापडावी म्हणून विलक्षण ठिकाणी ठेवलेली असते. त्याला सर्वत्र संचाराला मोकळीक असते. बायकामंडळीत बेधडकपणे घुसून मामींच्या ट्रंकेच्या वरच्या कप्प्यांत ठेवलेल्या कापराच्या पुड्या काढायचे लैसन नारायणखेरीज अन्यांस नसतं. तेवढ्यांत एखाद्या थोरल्या आजीबाई----"नारायणा----अरे राबतोयस बाबा सारखा---कोपभर चहा तरी घे---थांब---

" नारायणाला थांबायला सवड नसते. परंतु तेवढ्यांत शंभराच्या नोटेचे रूपये करून आणलेले असतात ते मोजायला त्याला एक पांच मिनीटं लागतात आणि काकू गळ्यांतली किल्ली काढून फडताळ उघडून 'हे एक चार लाडू आणि बशीभर चिवडा' त्याच्यापुढे ठेवतात.....आणि मग ती थोरली आजी आणि तिचा हा उपेक्षित नातू यांचा एकूण मुलाकडील मंडळी या विषयावर आंतल्या आवाजांत संवाद होतो. आजीला नारायणा बद्दल पहिल्यापासून जिव्हाळा. आईवेगळें पोर म्हणून तिने ह्याला पाहिलेला. लग्नाच्या गर्दीत बाहेर राहून नारायण मांडवाची आघाडी सांभाळीत असतो. आणि आजीबाईच्या ताब्यांत कोठीची खोली असते. गळ्यांतल्या चांदीच्या गोफांत कानकोरणें, किल्ल्यांचा जुडगा आणि यमनीची आंगठी अडकवून आजीबाई फराळाचं---आणि मुख्यत: साखर सांभाळीत असतात. साखर उपसून देण्याचें काम त्यांचे ! तेवढ्यांत पेंगुळलेली दोनचार पोरेंहि त्यांच्यापुढे गोधड्यांवर आणून टाकून त्यांच्या आया बाहेर मिरवायला गेलेल्या असतात. फक्त लग्न लागल्यावर पहिल्या नमस्काराला वधूवर आजींच्या पुढे येतात त्यावेळीं---'आजी कुठाय---आजी कुठाय----' असे हाके सुरू होतात."औक्षवंत व्हा" असा आशीर्वाद देऊन आजी गळ्यांतून खर्र असा आवाज काढून नातीच्या पाठीवरून हात फिरवतांना एक आवंढा गिळतात. नारायण चिवड्याचा बकाणा मारतो."नव-यामुलाकडील मंडळी समंजस आहेत हो चांगली---" आजी विषयाचा प्रस्ताव मांडतात. वास्तविक समंजस आहेत की नाहीत असा हा प्रस्ताव असतो."डोंबलाची समंजस !" नारायणाचा शेरा पडतो. "अग साधी गोष्ट---मी त्या मुलाच्या काकाला म्हटलं की तुमच्याकडलीं एकदा माणसं मोजा---म्हणजे पानावर बसवतांना चटचट बसवतां येतील. तर मला म्हणाला, मी मोजणी-कारकून म्हणून नाही आलों इथे---हें काय बोलणं झालं? आम्हीही बोलूं शकलों असतों---वधूपक्ष पडला ना आमचा---". नव्या को-या धोतराला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दींत पुन्हा दिसेनासा होतो.

आजींना एकूण नव-यामुलाकडील्या मंडळींना रीत नाही एवढें कळतें.पंक्तींत वाढायचे काम वास्तविक नारायणाचें नव्हे. पण पाणी वेळेवर वाढायचे नाही हा एक लग्नांतल्या वाढप्यांचा शिरस्ताच आहे. बर्फ आणायला पाठवलेली मंडळी कधीही वेळेवर येत नसतात. पंगत उठत आली की बर्फ येतो. मग नारायण भडकतो आणि पाणी वाढण्याचें काम स्वत: करतो. ग्लासें, कप, द्रोण, फुलपात्रे, वाट्या जें काय हाताला लागेल तें प्रत्येकाच्या पानापुढे आदळीत---थोडें पाणी कपांत तर थोडें पानांत अशा थाटांत दणादण पाणी वाढत जातो. मधूनच श्लोकांचा आग्रह सुरू होतो. मंडळी आढेवेढे घेतात. नारायणहि 'अरे म्हणा श्लोक---हं चंदू म्हण...' असं कोणाच्या तरी अंगावर खेकसतो. [चंदू इंग्रजी नववींत गेल्यामुळे श्लोक वगैर बावळटपणा त्याला आवडत नाही. त्यांतून वधूपक्षाकडील एक फ्रॉकवाली मुलगी दोनदा-तीनदा त्याच्याशी बोललेली असते. ती आठवीत आहे---'जॉग्रफीचा स्टडी' कसा करावा हें चंदूने तिला सांगितलेलें आहे. चंदू जरासा घोटाळ्यातंच वावरत असतो. नारायणाच्या हुकुमाने तो उगीच गांगरतो आणि त्या फ्रॉकवाल्या मुलीच्या दिशेने पाहातो---ती त्याच्याकडे पाहून हसत असते.] बराच वेळ कोणीच श्लोक म्हणत नाही हें पाहून नारायण दणदणीत आवाजांत----'शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचें...' हा श्लोक एका हातांत पाण्याची झारी आणि दुस-या हातांत खास आग्रहाचे जिलब्यांचे ताट घेऊन ठणकावतो. श्लोकांची माळ सुरू होते---नारायण भक्कम भक्कम मंडळी पाहून जिलब्या वाढतो---पंगती उठतात----धर्माघरी भगवंतांनी खरकटीं काढलीं तसा नारायण पत्रावळी उचलायला लागतो---नोकरचाकर त्याच्या जोडीला कामाला लागतात---तेवढ्यांत नारायण पुन्हा सटकतो---आता तो वरातीच्या नादांत आहे. फुलांनी मढवलेली मोटार स्वत: जाऊन तो घेऊन येतो---बॅण्डवाल्यांना चांगली गाणीं वाजवण्याची धमकीहि देतो. रात्रीं अकराबाराच्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी (नारायणाचीच मामेबहीण) नारायणाला वाकून नमस्कार करते---इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडेधाव तिकडेधाव करणा-या हनुमंतासारखा भीमरूपी महारूद्र झालेल्या नारायणाचे ह्रदय भरून येते ! वधूवेषांत नटलेली सुमी !---- एवढीशी होती कारटी---माझ्या अंगाखांद्यावर खेळली वाढली----माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरांत बसवली होती हिला---आता चालली नव-याच्या घरीं ! वरून अवसान आणून नारायण म्हणतो, "सुमे---मजेंत रहा बरं---वसंतराव अशी मुलगी मिळाली नसती तुम्हांला---हां---आय ऍम द नोईंन हर चाईल्डहूड...." भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागीं उतरलेला चष्माच साधा वर करण्याचें निमित्त करून नारायण डोळे पुसतो---- भाऊसाहेबहि विरघळतात-- वरात जाते----नारायण मांडवांतल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो--वरातींतली मंडळी एक दीडला परततात---कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेंहि लक्ष जात नाही-- फक्त नारायणाची बायको आंत जाते---पिशवींतून दहा ठिगळं जोडलेलं पांघरूण काढते आणि हळूच कोचावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकांत येऊन मिसळते--समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचें किरटें पोर झोपलेलें असतें----त्याच्या बाळ मुठींत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळाकभिन्न झालेला असतो---मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुस-या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतात. बाकी सर्वत्र सामसूम असतें.

 --
पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)